मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक मुद्दे पुढे केले जातात - बाळासाहेब थोरात
By शेखर पानसरे | Published: April 11, 2023 04:47 PM2023-04-11T16:47:54+5:302023-04-11T16:48:11+5:30
देव हा शेतकऱ्यांमध्ये आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
संगमनेर : अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यांना सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे. मात्र, मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. देव हा शेतकऱ्यांमध्ये आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी (दि. ११) तालुक्याच्या पश्चिम भागातील सावरचोळ, मेंगाळवाडी, निमगाव खुर्द, निमगाव बुद्रूक, पेमगिरी, नांदुरी दुमाला आदी गावांमध्ये जाऊन आमदार थोरात यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्यांच्यासमवेत एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, पेमगिरी गावचे माजी सरपंच सोमनाथ गोडसे, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आदी उपस्थित होते.