कोरोनाची लक्षणे आढळलेल्या नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करा; राजेश टोपे यांच्या जिल्हाधिका-यांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 11:53 AM2020-07-12T11:53:35+5:302020-07-12T13:11:18+5:30
कोरोनाची लक्षणे आढळलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यापेक्षा संस्थात्मक क्वारंटाईन करा, अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी (१२ जुलै) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत.
अहमदनगर : कोरोनाची लक्षणे आढळलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यापेक्षा संस्थात्मक क्वारंटाईन करा, अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी रविवारी (१२ जुलै) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत.
नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नोबल मेडिकल फाउंडेशनतर्फे नगरच्या जिल्हा रुग्णालयांमध्ये २० खाटांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. या विभागाचे उद्घाटन रविवारी सकाळी आरोग्यमंत्रीराजेश टोपे व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाले. यावेळी मंत्री टोपे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार, खासदार सुजय विखे उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयातील रुग्णालयातील खाटांची अपुरी संख्या लक्षात घेता सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेसाठी नोबेल मेडिकल फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये अतिदक्षता विभाग उभारण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयामार्फतच हा विभाग चालवला जाणार आहे.
फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. बापूसाहेब कांडेकर, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब कांडेकर, विश्वस्त डॉ. संगीता कांडेकर, डॉ. पांडुरंग ढवळे, डॉ.नानासाहेब अकोलकर, डॉ.विजय पाटील, डॉ. सुंदर गोरे, डॉ. सुनील बंदिष्टी यांचे यासाठी योगदान लाभले आहे.