संस्थात्मक विलगीकरण यापुढे सक्तीचे -मंत्री थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:18 AM2021-04-26T04:18:03+5:302021-04-26T04:18:03+5:30
थोरात म्हणाले, घरात विलगीकरणामध्ये राहणाऱ्या काही बाधितांमुळे संपूर्ण कुटुंबाला संसर्ग होत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. हा प्रकार ...
थोरात म्हणाले, घरात विलगीकरणामध्ये राहणाऱ्या काही बाधितांमुळे संपूर्ण कुटुंबाला संसर्ग होत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी आता सरसकट संस्थात्मक विलगीकरण वाढवावे लागेल. सरकारी केंद्रांवर जाण्याची काहींची तयारी नसेल तर त्यांना पैसे भरून हॉटेल व लॉजिंग पुरवता येईल. त्या दृष्टीने व्यावसायिकांशी प्रशासनाने चर्चा करून निर्णय घ्यावा. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये गाव पातळीवर ग्राम सुरक्षा समित्या कार्यान्वित होत्या. त्यांना पुन्हा चालना देण्याची गरज आहे, अशी सूचना मंत्री थोरात यांनी केली.
शहरामध्ये अल्फा व संतलूक या दोन केंद्रावर सध्या लसीकरण केले जात आहे. लवकरच १८ वर्षे वयापुढील सर्वांचे लसीकरण हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे आणखी काही केंद्रांना लसीकरणाची मान्यता द्यावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
----------
श्रीरामपूरला ऑक्सिजन प्रकल्प
येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये लवकरच हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. नगर येथे मंत्री थोरात यांनी त्याची घोषणा केली होती. दररोज २५० सिलिंडर क्षमतेचा हा प्रस्तावित प्रकल्प आहे. त्याकरिता ८० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. श्रीरामपूर तालुक्याची सध्याची गरज दररोज १३० सिलिंडरची आहे. एका महिन्यात प्रकल्प कार्यान्वित होऊ शकेल, अशी माहिती आ. लहू कानडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
----------