डिंबे माणिकडोह बोगद्याचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना : अण्णा हजारे यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 05:50 PM2018-10-12T17:50:38+5:302018-10-12T17:50:44+5:30
कुकडी सुधारीत प्रकल्प आरखड्यात डिंबे ते माणिकडोह बोगद्याचा समावेश करण्याच्या मागणीसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुढाकार घेतला आहे.
श्रीगोंदा : कुकडी सुधारीत प्रकल्प आरखड्यात डिंबे ते माणिकडोह बोगद्याचा समावेश करण्याच्या मागणीसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुढाकार घेतला आहे. हजारे यांच्या सुचनेनुसार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बैठक घेत डिंबे ते माणिकडोह बोगद्याचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागातील अधिका-यांना दिले.
कुकडी लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या दृष्टीने डिंबे माणिकडोह बोगद्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सरकारने आता ठोस कार्यवाही करण्याची गरज असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.
आमदार राहुल जगताप म्हणाले, डिंबे- येडगाव दरम्यान ५५ किमी लांबीचा कालवा आहे. हा कालवा पुर्ण क्षमतेने चालत नाही. त्यामुळे अडीच टीएमसी पाणी वाया जाते. डिंबे - माणिकडोह बोगदा हा १६ किलोमीटर अंतर लांबीचा बोगदा झाला तर माणिकडोह धरण दरवर्षी १००% भरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा बोगदा होणे गरजेचे आहे, यामुळे कुकडीचे एक आवर्तन वाढण्यास मदत होईल.
गिरीष महाजन म्हणाले, अण्णा हजारे यांच्या सुचनेनुसार डिंबे माणिकडोह बोगद्याचा कुकडी सुधारीत प्रकल्प आराखड्यात समावेश करून बोगदा सर्व्हे करून घेणार आहे.
यावेळी जलसंपदा विभागाचे सचीव रा. वी. पानसे, कुकडीचे अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ, विश्वनाथ अंतु कोरड,े लाभेश अतुल लोखंडे, किरण कुलकर्णी, अलका अहिरराव उपस्थित होते.
हजारे मैदानात
डिंबे ते माणिकडोह बोगद्याचा प्रश्न गेल्या २० वर्षापासून फक्त चर्चेत आहे. पण कार्यवाही मात्र झाली नाही. आमदार राहुल जगताप यांनी अण्णा हजारे व गिरीश महाजन यांच्यातील सलोख्याचे संबंध विचारात घेऊन हजारे यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. महाजन यांनी आपल्या निवासस्थानी जलसंपदा विभागातील अधिका-याची बैठक घेतली. आता हजारेंना दिलेला शब्द सरकारला पुर्ण करावा लागणार आहे.