बुद्धिमत्ता शहरी, ग्रामीण भेदभाव करत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:25 AM2021-08-24T04:25:16+5:302021-08-24T04:25:16+5:30
तिसगाव : बुद्धिमत्ता ही काही कुणाची मक्तेदारी नाही. ती शहरी अथवा ग्रामीण असा भेदभाव करीत नाही. व्यावसायिकता, नोकरी किंवा ...
तिसगाव : बुद्धिमत्ता ही काही कुणाची मक्तेदारी नाही. ती शहरी अथवा ग्रामीण असा भेदभाव करीत नाही. व्यावसायिकता, नोकरी किंवा करिअर घडविण्यासाठी नव्हे, तर सामाजिक उत्थानासाठी शिक्षण घ्यायचे आहे, ही अपेक्षा नवीन शैक्षणिक धोरणात आहे, असे प्रतिपादन मराठवाडा विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलगुरू डॉ. पंडित क्षीरसागर यांनी केले.
वृद्धेश्वर कारखाना (ता. पाथर्डी) येथे दादापाटील राजळे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त आयोजित स्मृती व्याख्यानमालेत ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वृद्धेश्वर कारखाना अध्यक्ष आप्पासाहेब राजळे होते. प्रा. अर्जुनराव पोकळे, उपाध्यक्ष रामकिसन काकडे, संचालक उद्धवराव वाघ, सुभाषराव ताठे, कार्यकारी संचालक जालिंदर पवार व्यासपीठावर होते.
जिज्ञासू वृत्तीने सर्वांगीण आकलन व समज स्वतः घेत शिक्षणाविषयी आस्था हवी. अशा पद्धतीने शिकविण्याची ऊर्मी नवीन शिक्षण धोरणात शिक्षकांकडून अपेक्षित आहे. अल्पशिक्षित असूनही दादापाटील राजळे ही भूमिका जगले, म्हणून ते सामाजिक शिक्षक होते, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
प्रास्ताविक प्राचार्य राजधर टेमकर यांनी केले. राजेंद्र इंगळे यांनी आभार मानले. जयंतीनिमित राजळे यांच्या स्मृतिस्थळावर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. प्रा. विक्रम राजळे, निर्मला काकडे, राजकुमार घुले, अशोकराव ताठे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
---
२३ तिसगाव राजळे
वृद्धेश्वर कारखाना येथे दादापाटील राजळे यांच्या स्मृतिस्थळावर मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.