शिर्डीतून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे; कार्गो सेवाही सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 05:06 PM2019-11-09T17:06:58+5:302019-11-09T17:07:45+5:30
साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नवीन टर्मिनल व कार्गो सेवा सुरू करण्यासाठी येत्या एप्रिलपासून काम सुरू होईल.
शिर्डी : साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नवीन टर्मिनल व कार्गो सेवा सुरू करण्यासाठी येत्या एप्रिलपासून काम सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी दिली़.
राज्यात मुंबई, पुणे, नागपूरनंतरचे शिर्डी चौथे तसेच देशातील वेगाने वाढणारे एकमेव विमानतळ ठरले असल्याचे काकाणी यांनी सांगितले़. काकाणी यांनी शनिवारी साईदरबारी हजेरी लावली. संस्थानच्या वतीने मंदिर पर्यवेक्षक रामदास कोकणे यांनी त्यांचा सत्कार केला़. यावेळी रागिनी कोते, प्रदीप वाघ, निलेश डांगे, भागवत कोते उपस्थित होते़.
धावपट्टीबरोबरच टर्मिनलचा विस्तार करण्यात आला आहे. अत्याधुनिक रडार यंत्रणा बसविण्यात आली आहे़. विमाततळावर वीज निर्मितीसाठी सोलर प्लॅन्ट टाकण्यात आला आहे. परिसरातील विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले आहे़. नोव्हेंबरमध्ये नाईट लँडींगचे काम पूर्ण होवून डिसेंबरअखेर यासाठी परवाना मिळेल. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नवीन टर्मिनल व शेतमालासाठी कार्गो सेवा सुरू करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे़. यासाठी दोनशे कोटींचा आराखडा बनविण्यात आला आहे. एप्रिलमध्ये काम सुरू होईल, असे काकाणी यांनी सांगितले़.
शिर्डी विमानतळावर विमान पार्किंगची क्षमता चारवरून अकरापर्यंत वाढविण्यात येत आहे़. येथे इंधन भरण्याचीही सुविधा आहे. एप्रिलपासून मुंबईत विमान उतरवणे शक्य नसेल तेव्हा तेथील विमाने शिर्डीत वळविण्यात येतील़. सध्या ही विमाने अहमदाबाद येथे नेण्यात येतात़. आंतरराष्ट्रीय सुविधा निर्माण करेपर्यंत सध्याही पंधरा दिवस आगाऊ परवानगी काढून विदेशातून येणारी खासगी विमाने येथे उतरु शकतील़, असेही काकाणी यांनी सांगितले़.
रोज चाळीस विमानांचे उड्डाणे होणार
सध्या देशांतर्गत सेवा वाढवण्यावर भर आहे. दोन वर्षापूर्वी चार विमानाने सुरू झालेल्या या विमानतळावर आता रोज अठ्ठावीस उड्डाणे होत आहेत़. येत्या दोन महिन्यात ही संख्या चाळीसपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे़. यात शिर्डी-तिरुपती देवस्थानांना जोडणा-या सेवेचाही समावेश असेल़. दोन वर्षात पाच लाख प्रवाशांनी शिर्डी विमानसेवेचा लाभ घेतला़. या वर्षात हा आकडा सात लाखांवर नेण्याचा मानस आहे. पुढील वर्षी दुप्पट म्हणजे चौदा लाखांवर नेण्याचा कंपनीचा संकल्प असल्याचे काकाणी यांनी सांगितले़.