International Yoga Day 2019 : निरोगी आरोग्य हवेय, मग योगा कराच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:51 AM2019-06-21T11:51:56+5:302019-06-21T11:55:49+5:30
घर, संसार, मुले आणि कुटुंबाला सांभाळताना महिलांची सर्वाधिक ओढताना होते़ आरोग्याकडेही अक्षम्य दुर्लक्ष होते़
रोहिणी मेहेर
अहमदनगर : घर, संसार, मुले आणि कुटुंबाला सांभाळताना महिलांची सर्वाधिक ओढताना होते़ आरोग्याकडेही अक्षम्य दुर्लक्ष होते़ सर्वाधिक तणावात असणारा घटक म्हणूनही महिलांकडे पाहिले जाते़ त्यामुळे महिलांनी निरोगी आरोग्यासाठी केवळ ४५ मिनिटे वेळ देऊन रोज योगा करावा़ कोणत्याही खर्चाविना अत्यंत साधक असलेला उपचार म्हणजे योग आहे़ पाचव्या जागतिक योग दिनानिमित्त ‘लोकमत’शी संवाद साधताना महिला योगा प्रशिक्षिकांनी वरील मत व्यक्त केले़महिलांच्या आयुष्यात योगामुळे शांतता आणि जीवन आनंदी होऊ शकते़ शारिरीक व मानसिक ताण हलके करण्यासाठी योग महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले़
शरीराचा आणि मनाचा खूप घनिष्ठ संबंध आहे़ योगामुळे मन प्रसन्न होते़ एकाग्रता वाढते़ योगासाठी प्रत्येक महिलेने ४५ मिनिटे दिलीच पाहिजेत़ ताणतणावामुळे महिलांमध्ये विस्मरणाचे आजार वाढत आहेत़ हा ताण कमी करण्यासाठी योगा करणे आवश्यक आहे़ योगामुळे स्मरणशक्ती वाढते़ शरीर सुदृढ होते़ प्राणायाममुळे श्वसनाचे विकार होत नाहीत़- मनिषा लोखंडे, योगा प्रशिक्षक, जिल्हा प्रभारी, महिला पतंजली समिती़
योगाला वयोमर्यादा नाही़ कोणत्याही वयोगटापर्यंत योगा करता येतो़ योेगामुळे आपले जीवन निरोेगी राहते़ धावपळीच्या युगात शरीराकडे अनेकदा दुर्लक्ष होते़ त्यामुळे विविध आजार बळावतात़ मात्र, योगा केल्यामुळे मनुष्य शारीरिक व आत्मिकदृष्ट्या तंदूरुस्त राहतो़ योगा केल्यानंतर चेहऱ्यावर तजेला दिसतो़ जीमपेक्षाही योगा करणे फायदेशीर आहे़ औषधोपचारांपेक्षा योगाने रुग्ण लवकर बरा होतो़ त्यामुळे महिलांसाठी योगा अत्यंत गरजेचा आहे़-नूतन जोंधळे, योग प्रशिक्षिका
सध्याच्या जीवनशैलीमध्ये प्रदूषण, भेसळ, रासायनिक खतांचा अतिवापर, कृत्रिम पद्धतीने पिकविलेली फळे या सगळ्यांमुळे मानवी जीवन अत्यंत धोकादायक झाले आहे़ अस्थमा, हृदयविकार, मधुमेह अशा विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे़ सदोष जीवन पद्धतीने तरुणी अधिक मानसिक तणावाखाली जात आहे़ यावर योगा हा एकमेव व उत्तम उपाय आहे़ त्यामुळे महिला, तरुणींनी रोज न चुकता योगा केलाच पाहिजे़ योगामुळे शारीरिक, मानसिक आणि धार्मिक पातळीवर समतोल राखला जातो व व्यक्ती कणखर बनतात़ -ऋतुजा लोखंडे, योग प्रशिक्षिका
योगा ही एक व्याधीमुक्त आणि समाधीयुक्त जीवनाची संकल्पना आहे़ योगा ही आत्मउपचार पद्धती आहे़ योगामुळे शारीरिक स्वास्थ्यासह अंतरिक स्वास्थ मिळते आणि शरीर व मन दोन्हीही चांगले राहते़ योगामुळे नकारात्मक विचार जाऊन सकारात्मकता वाढीस लागते़ त्यामुळे प्रत्येकाने योगा केलाच पाहिजे़ -संगीता रायकवाड, योगा प्रशिक्षिका
योग ही एक कला आहे़ योगामुळे शरीर, मन आणि आत्मा हे एकसाथ जोडले जातात़ योगामुळे आपण फिट राहतो़ दैनंदिन तणाव कमी होतात़ वजनात घट होते आणि शक्ती वाढते़ योग प्रशिक्षकांच्या मदतीने योगाचे शिक्षण घ्यावे, सराव करणे महत्वाचे आहे़ आजारपणामुळे औषधोपचार सुरु असेल तर योग प्रशिक्षक आणि डॉक्टर यांचा सल्ला घ्यावा़ -रोहिणी पवार, योग प्रशिक्षिका