कोरोना लसीकरणात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:24+5:302021-05-16T04:20:24+5:30
श्रीगोंदा : शहरासह तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वाढू लागला आहे. यापुढे आरोग्य विभागही हतबल असून, सर्वसामान्य ...
श्रीगोंदा : शहरासह तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वाढू लागला आहे. यापुढे आरोग्य विभागही हतबल असून, सर्वसामान्य मात्र लसीकरणापासून वंचित राहत आहेत. सर्वसामान्यांना रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
कोरोना प्रतिबंधक लसी दिल्या जाणाऱ्या केंद्रांवर नागरिक अगदी पहाटेपासूनच रांगा लावतात. सामान्य नागरिक ऑनलाइन नोंदणी करतात. आधार कार्ड घेऊन रांगेत उभे असतात. मात्र, लसीकरण केंद्रावर परिसरातील काही राजकीय मंडळी स्वत:ची यंत्रणा लावतात. त्यामुळे गोंधळमय परिस्थिती होते. आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकारी यांना सामान्य नागरिकांचा रोष पत्करावा लागतो. आरोग्य विभागाने एक कर्मचारी नेमून लसीकरणासाठी क्रमाने आलेल्या नागरिकांची नोंद करून घ्यायला हवी. संबंधित नागरिकाला लसीकरणाचा नंबर द्यावा. त्यांना सावलीला बसण्यास सांगावे.
माइकवर क्रमाने नाव जाहीर करून त्यांना लस द्यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, काहीच होताना दिसत नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे मोजक्याच लोकांना लस मिळते, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. हा गोंधळ सोडविण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांनी इतर यंत्रणांचीही मदत घ्यायला हवी, अशी मागणी होत आहे.
---
व्हीआयपी लसीकरण
सध्या काही नेते, कार्यकर्ते मंडळी लसीकरण केंद्रावर येतात. व्हीआयपीच्या नावाखाली आपल्या जवळच्यांना एखाद्या देवस्थानमध्ये व्हीआयपींना जसे थेट दर्शन दिले जाते. त्याप्रमाणे, थेट लस देण्यास भाग पाडतात. आरोग्य विभागाने व्हीआयपी लसीकरण पद्धत बंद करावी, अशी मागणी होत आहे.