होम क्वारंटाईन करण्यासंदर्भात सूचना देणा-या कर्मचा-यास धक्काबुकी; तिघांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:47 AM2020-03-30T11:47:50+5:302020-03-30T12:25:41+5:30
कोपरगाव तालुक्यातील देर्डे-को-हाळे येथे कल्याणहून आपल्या गावी आलेल्या एकास होम क्वारंटाईन करण्यासाठी संदर्भात सूचना देण्यासाठी गेलेल्या तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या पथकातील एका कर्मचा-याला तिघांनी धक्काबुकी केली. ही घटना रविवारी (२९ मार्च ) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील देर्डे-को-हाळे येथे कल्याणहून आपल्या गावी आलेल्या एकास होम क्वारंटाईन करण्यासाठी संदर्भात सूचना देण्यासाठी गेलेल्या तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या पथकातील एका कर्मचा-याला तिघांनी धक्काबुकी केली. ही घटना रविवारी (२९ मार्च ) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात लक्ष्मीकांत कारभारी विघे, सौमित्र लक्ष्मीकांत विघे, सौरभ लक्ष्मीकांत विघे या तिघांविरुद्ध रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तहसील कार्यालयातील लिपिक रवींद्र नारायण देशमुख यांनी कोपरगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. कोपरगाव तालुक्यातील देर्डे- को-हाळे येथील लक्ष्मीकांत कारभारी विघे हे (१८ मार्च) पासून देर्डे- को-हाळे येथे आलेले आहेत. कोरोनाच्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर त्यांना क्वारंटाईन करण्यासंदर्भातील तपासणी करून घेण्यासंदर्भात फोनवरून संपर्क केला असता त्यास कुठलाच प्रतिसाद न देता उद्धट वर्तन करीत होता. त्यावर रविवारी (२९ मार्च ) रोजी तहसीलदार योगेश चंद्रे, आरोग्य सहायक सचिन जोशी, होमगार्ड अमोल कचरू, विजय बेंडके व चालक गाडीलकर गस्ती दरम्यान सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास देर्डे- को-हाळे येथे पोहचलो. लक्ष्मीकांत कारभारी विघे व त्यांची दोन मुले सौमित्र लक्ष्मीकांत विघे, सौरभ लक्ष्मीकांत विघे हे त्यांच्या घरी कोरोनाची खबरदारी म्हणून तोंडाला कोणत्याही प्रकारचा मास्क न लावलेले आढळून आले. त्यावर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी लक्ष्मीकांत विघे यांना तुम्ही कल्याण येथून आले आहात. क्वारंटाईन तपासणी करून तसा हातवार शिक्का मारून घ्या. मास्कचा वापर करा असे सांगत होते. त्यावर लक्ष्मीकांत विघे तहसीलदार यांना उद्धटपणे म्हणाला, तुम्ही कोण मला समजावून सांगणारे? मला तपासणीची गरज वाटत नाही? त्यावर मी विघे यास तुम्हाला शासनाच्या आदेशाचे पालन करावे लागेल. असे सांगत असतानाच लक्ष्मीकांत विघे व त्याची दोन्ही मुले सौमित्र विघे व सौरभ विघे यांनी माझ्या शर्टची कॉलर पकडून मला धक्काबुकी करून खाली पाडून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे.