अहमदनगर जिल्हा बँक भरतीची निपक्षपातीपणे चौकशी करा; राष्ट्रवादीसह, भाजप, सेनाही चौकशीवर नाराज, काँग्रेसकडून प्रतिक्रियाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 10:51 AM2020-05-16T10:51:04+5:302020-05-16T10:51:47+5:30
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीप्रक्रियेबाबत जनतेच्या मनात शंका आहेत. त्यामुळे याबाबत निपक्षपातीपणे चौकशी होऊन सर्व शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया राजकीय पक्षांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीप्रक्रियेबाबत जनतेच्या मनात शंका आहेत. त्यामुळे याबाबत निपक्षपातीपणे चौकशी होऊन सर्व शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया राजकीय पक्षांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.
जिल्हा बँकेच्या भरतीतील अनियमिततेबाबत ‘लोकमत’ गत तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. बँकेच्या संचालक मंडळाने याबाबत मौन धारण केले आहे. मात्र, जनतेतून याबाबत नाराजी वाढत असून अनेकांनी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, माहिती अधिकार कार्यकर्ते शशिकांत चंगेडे, वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक अरुण जाधव यांनी सहकार सचिव व आयुक्तांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनीही ‘लोकमत’ला प्रतिक्रिया देताना भरतीच्या चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी मात्र वरिष्ठांशी बोलून प्रतिक्रिया देऊ, असे सांगितले.
जिल्हा बँंक भरतीची निपक्षपातीपणे व योग्य एजन्सीकडून चौकशी होणे आवश्यक आहे. ही शेतक-यांची व नावाजलेली बँक आहे. तेथे काहीही गालबोट लागता कामा नये. तत्कालीन सहकार आयुक्त व इतर अधिकाºयांनी भरतीबाबत योग्य निर्णय घेतले आहेत का? ‘नायबर’ या संस्थेने भरतीचे नियम पाळले आहेत का? न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी झाली आहे का? या सर्व बाबींची तपासणी व्हावी. भरतीत गैरव्यवहार झाला असेल तर तो समोर यायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेस कधीही अशा गोष्टींचे समर्थन करणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले.
न्यायालयाच्या निर्णयानंतर भरतीतील संशयास्पद उत्तरपत्रिका खासगी एजन्सीकडून तपासून का घेतल्या ही बाब शंकास्पद आहे. फेरचौकशीत संशयित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या कार्बन कॉपींची तपासणी झाली नाही ही बाब ‘लोकमत’ने समोर आणली आहे. ही तपासणी का झाली नाही हेही आक्षेपार्ह आहे. त्यामुळे योग्य चौकशी होणे आवश्यक आहे. सहकार हा सामान्य जनतेच्या हितासाठी आहे. या संस्थांमध्ये गैरकारभार होत असेल तर ते चूक आहे. सहकारी संस्थांवर सामान्य कुटुंबातील लोक येत नाहीत, तोवर असे प्रकार थांबणार नाहीत, असे भाजपचे उतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी सांगितले.
जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीत गैरव्यवहार झाले असतील तर त्याची निश्चित चौकशी झाली पाहिजे़ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी़ वेळप्रसंगी सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल़, असे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी सांगितले.