तहसीलदार ज्योती देवरे यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:25 AM2021-09-15T04:25:28+5:302021-09-15T04:25:28+5:30
अहमदनगर : पारनेर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. देवरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग ...
अहमदनगर : पारनेर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. देवरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी जातेगाव (ता. पारनेर) येथील नागरिक कारभारी भाऊसाहेब पोटघन यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे.
याबाबत लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांना मंगळवारी (दि.१४) तक्रार अर्ज देण्यात आला. या तक्रारी संदर्भात ॲड. सरोदे यांनी सांगितले, तहसीलदार देवरे यांनी भ्रष्टाचार केल्याचे सातत्याने आरोप होत आहेत. यात अनेक जण सहभागी असण्याची शक्यता आहे. नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी देवरे यांच्याबाबत नेमलेल्या चौकशी समितीने नुकताच अहवाल दिला आहे. यात स्पष्टपणे नमूद आहे की, बेकायदेशीर वाळूउपसा करणारी वाहने तहसीलदार देवरे यांनी जप्त केल्यानंतर सरकारी शुल्क भरून न घेताच ती सोडून दिली. अकृषक कामासाठी जमीन हस्तांतरित करताना अनियमितता, वाळू तस्करांना संरक्षण देणे, तसेच देवरे या जळगाव येथे कार्यरत असतानाही जमिनीच्या संदर्भातील कामकाजात भ्रष्टाचार केल्याचा ठपका आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी भ्रष्टाचार केला असल्याचे दिसत असल्याने त्यांची चौकशी करावी, अशी पोटघन यांनी मागणी केली आहे.
देवरे यांची पारनेर येथून बदली झालेली असली तरी कामाचे स्वरूप तेच राहणार आहे. त्यामुळे त्यांनी आपली कार्यपद्धती बदलावी, हा केवळ देवरे यांच्या विरोधातील तक्रार अर्ज नाही तर सरकारी पदाचा गैरवापर करणाऱ्यांसाठी ही धोक्याची सूचना असल्याचे यावेळी ॲड. सरोदे यांनी सांगितले.
-------------------------
भ्रष्टाचाराची पाठराखण होऊ शकत नाही
आत्महत्ये संदर्भात देवरे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपबाबत बोलताना सरोदे म्हणाले, महिलांना कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दबाव सहन करावे लागतात, हे वास्तव आहे. देवरे यांच्यावर तसा अन्याय झाला असेल तर, मी वकील म्हणून त्यांच्यासोबत राहील. पण, यातून भ्रष्टाचाराची पाठराखण होऊ शकत नाही. त्यांच्या क्लिपमध्ये सत्य असण्याची शक्यता लक्षात घेतली पाहिजे. पण, चौकशी होऊ नये म्हणून भावनिक आवाहन करणे अथवा महिला असण्याचा गैरफायदा घेणे या गोष्टी योग्य नाही. ज्या महिलांवर कामाच्या ठिकाणी खरोखर अन्याय होत आहे, त्यांच्या तक्रारींचे यातून महत्त्व कमी होईल, असे मत सरोदे यांनी व्यक्त केले.