साहेबराव गायकवाड यांच्या मृत्युची चौकशी करा; राधाकृष्ण विखे यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 02:29 PM2020-05-08T14:29:32+5:302020-05-08T14:30:28+5:30
पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या मृत्युची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली आहे. गायकवाड यांच्या निधनामागे महसूल विभागातील बदल्यांमधील आर्थिक हितसंबंधच कारणीभूत असल्याचा थेट आरोप विखे यांनी शुक्रवारी एका पत्रकाव्दारे केला आहे.
लोणी : पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या मृत्युची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली आहे. गायकवाड यांच्या निधनामागे महसूल विभागातील बदल्यांमधील आर्थिक हितसंबंधच कारणीभूत असल्याचा थेट आरोप विखे यांनी शुक्रवारी एका पत्रकाव्दारे केला आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या मृत्युची वेगळीच कारणे आता समोर येत येत आहेत. साता-यातून आठ महिन्यांपूर्वीच पुण्यात त्यांची बदली झाली होती. मात्र चारच दिवसात त्यांची पुन्हा पिंपरी चिंचवड येथे अचानक बदली करण्याचे असे कोणते कारण घडले? असा सवाल विखे यांनी केला आहे. प्रशासनापुढे सध्या कोरोना संकटाचे मोठे आव्हान असताना गायकवाड यांची बदली होणे हे शंकास्पद ठरते. राज्य सरकारने सध्या प्रशासनातील सर्व बदल्यांना स्थगिती दिली असतानाही महसूल विभागात गायकवाड यांची बदली का करण्यात आली? याची चौकशी करावी, अशी मागणी विखे यांनी केली. गायकवाड यांच्या या बदलीला मॅटमध्ये स्थगितीही मिळाली होती. त्यामुळेच त्यांच्यावर कोणी दबाव आणला का? याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे विखे यांचे म्हणणे आहे.