बाळ बोठे याच्या अपसंपदेची उघड चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:20 AM2021-04-10T04:20:40+5:302021-04-10T04:20:40+5:30
अहमदनगर : बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ जगन्नाथ बोठे याच्या अपसंपदेची उघड चौकशी करून त्याची बेहिशेबी मालमत्ता जप्त ...
अहमदनगर : बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ जगन्नाथ बोठे याच्या अपसंपदेची उघड चौकशी करून त्याची बेहिशेबी मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुरेश लगड यांनी आयकर विभागाकडे केली आहे.
लगड यांनी आयकर विभागाचे प्रधान आयुक्त (पुणे) यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. तो ९० दिवसांपेक्षा जास्त काळ फरार होता. बोठे याच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. सुरुवातीच्या काळात बोठे याची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण होती. त्याची सुरुवातीची आणि आताची आर्थिक परिस्थिती याची सखोल चौकशी केली तर अनेक धक्कादायक बाबी उघड होतील. बोठे याचे उत्पन्न व त्याच्याकडे असलेली ज्ञात, अज्ञात, जंगम मिळकत, रोख रक्कम याची बारकाईने चौकशी करावी. बोठे हा अनेक संस्थांमध्ये स्लीपिंग पार्टनर, पुण्याच्या काही हॉस्पिटलमध्ये भागीदार असल्याचे समजते तसेच नगर शहर व परिसरात त्याची जमीन व प्लॉट आहेत. बोठे याच्या इतर अज्ञात संपत्तीची ही चौकशी करण्यात यावी. बोठे याला नोकरीतून मिळालेले उत्पन्न आणि त्याच्याकडे सध्या असलेली संपत्ती याचा तुलनात्मक अभ्यास करून त्याची बेहिशोबी मालमत्ता जप्त करावी तसेच अनेक संस्थांमध्ये तो छुपा भागीदार (स्लीपिंग पार्टनर) असल्याचे समजते. त्याचीही जनहितार्थ चौकशी करावी, अशी मागणी सुरेश लगड यांनी केली आहे.