पारनेरमधील सशस्त्र दरोड्याचा दोन पथकांद्वरे तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 07:26 PM2017-10-26T19:26:34+5:302017-10-26T19:28:26+5:30
पारनेर : तालुक्यातील म्हसे खुर्द येथील मदगे वस्तीवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या तपासासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, काही ...
पारनेर : तालुक्यातील म्हसे खुर्द येथील मदगे वस्तीवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या तपासासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, काही संशयितांची नावे समोर आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितली. या दरोड्यात चारजण जखमी झाले असून, सुमारे सात लाखांचा ऐवज लुटण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द गावातील मदगे वस्तीवर गणपत मदगे यांच्या घरी बुधवारी पहाटेच्या एक वाजता तोेंड बांधून आलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी गणपत मदगे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा आनंद, नारायण, सून व नातू या सर्वांना बेदम मारहाण करीत त्यांच्याकडील सुमारे ९ तोळे दागिने व सुमारे रोख पन्नास हजार रूपयांचा ऐवज लुटला. त्यानंतर दरोडेखोरांनी कोरेकर वस्तीवर शेखर कोरेकर व त्यांची पाहुणी सुमन चौधरी यांनाही मारहाण केली होती. या दरोड्याची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्यासह पोलीस दाखल झाले होते. त्यावेळी श्वानपथक आणण्यात आले़ पण दरोडेखोर वाहनाने येऊन पळून गेल्याने श्वानास त्यांचा माग काढता आला नाही. दरम्यान यामधील जखमींवर शिरूर येथील रूग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पारनेर व नगर पोलीस यांची स्वतंत्र तपास पथके बनवली आहेत. काही संशयित दरोडेखोरांची नावे समोर आली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
तपास पथकांकडे संशयितांची यादी
पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द गावातील दरोडा प्रकरणी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत़ काही संशयितांची नावे त्यांच्यासमोर असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे़
-आनंद भोइटे, पोलीस उपअधिक्षक, नगर