हिंगणी बंधाऱ्याच्या तुटलेल्या कठड्यांमुळे अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:19 AM2021-04-06T04:19:31+5:302021-04-06T04:19:31+5:30
प्रशासनाने याबाबत निर्णय घेऊन या बंधाऱ्यावर संरक्षक कठडे बांधावेत, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. सध्या मुर्शतपूर फाटा ...
प्रशासनाने याबाबत निर्णय घेऊन या बंधाऱ्यावर संरक्षक कठडे बांधावेत, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. सध्या मुर्शतपूर फाटा ते हिंगणी हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. वेळोवेळी नागरिकांनी मागणी केल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून पडून असलेल्या या रस्त्याचे काम सध्या सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे. मात्र, पुढे बंधाऱ्याहून हिंगणीकडे जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. गोदावरी नदीला जेव्हा दुथडी भरून पाणी असते तेव्हा अपघाताचे प्रमाण वाढते. या रस्त्याचे काम चालू असतानाच या पुलावर संरक्षक कठडे बांधले गेले, तर अपघाताचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. कठड्यावरील संरक्षक लोखंडी पाइप व इतर साहित्य थोडेथोडे करून चोरट्यांनी चोरून नेले. काही ठिकाणी सिमेंटचे कठडे होते ते देखील तुटले आहेत. त्यामुळे या पुलावरून जाताना जीव मुठीत धरून जावे लागते. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पुलावर कठडे बांधून द्यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
----------
फोटो - ०५हिंगणी कठडे
हिंगणी येथील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावर कठडे नसल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.