पंतप्रधानांना निळवंडे धरणासह कॅनॉलच्या उद्घाटनाचे निमंत्रण- राधाकृष्ण विखे पाटील
By शेखर पानसरे | Published: May 17, 2023 06:48 PM2023-05-17T18:48:18+5:302023-05-17T18:48:25+5:30
डाव्या कालव्याचे काम पूर्ण, पंधरा दिवसात चाचणी.
संगमनेर : निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे काम महिनाभरात पूर्णत्वाला जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निळवंडे धरणासह कॅनॉलच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले आहे. असे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
संगमनेर तालुक्यातील डिग्रस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, ज्येष्ठ नेते रखमाजी पाटील खेमनर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवारी (दि. १७) डिग्रस येथे आयोजीत कार्यक्रमात महसूल मंत्री विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असून येत्या पंधरा दिवसात चाचणी होणार आहे.
उजव्या कालव्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. यासाठी उभारावे लागलेले सेतूचे कामही पूर्ण झाले आहे. या भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, हा भाग टँकरमुक्त व्हावा, यासाठी रखमाजी खेमनर हे सातत्याने आग्रही होते. यासाठीच ८ कोटी रुपयांची पाणी योजना त्यांच्या पाठपुराव्यातून या गावांसाठी मंजूर झाली. निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांची असलेली इच्छा पूर्ण करणे, हीच खरी श्रद्धांजली त्यांना ठरणार आहे.