हत्यारांसह इराणी टोळी पकडली, पाच आरोपींचा समावेश : चारचाकीसह अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 06:48 PM2020-03-05T18:48:50+5:302020-03-05T18:48:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने निघालेली पाचजणांची इराणी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सावेडीतील भिस्तबाग परिसरात हत्यारांसह पकडली. त्यांच्याकडून एक चारचाकी गाडीसह हत्यारे, मोबाईल असा अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने निघालेली पाचजणांची इराणी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सावेडीतील भिस्तबाग परिसरात हत्यारांसह पकडली. त्यांच्याकडून एक चारचाकी गाडीसह हत्यारे, मोबाईल असा अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नगर शहरातील सावेडी भागात दरोडा टाकण्यासाठी ही इराणी टोळी येत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त खबºयामार्फत मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईची योजना आखली. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दोन पंचांना बोलावून घेतले. पंचासह गुन्हे शाखेचे मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, सुरेश माळी, रणजित जाधव, चालक संभाजी कोतकर यांच्या पथकाने सावेडीतील तपोवन रस्त्यावर भिस्तबाग महाल परिसरात सापळा लावला.
रात्री पावणेनऊच्या सुमारास एस संशयित कार कॉटेज कॉर्नर रोडकडील बाजूने येताना पोलिसांना दिसली. खबºयाने वर्णन केलेली ती हीच कार असल्याची खात्री पटल्यानंतर पथकाने गाडीला घेराव घालून गाडी थांबवली. पोलिसांनी गाडीतील इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे राजेश बबन देशमुख (कारचालक- वय २४, राहुरी), कंबर रहिम मिर्झा (वय ३१, श्रीरामपूर), जफर मुक्तार शेख (वय २९, सुभेदार गल्ली, श्रीरामपूर), जाकीर ऊर्फ जग्ग्या युनूस खान (वय २५, इराणी गल्ली, श्रीरामपूर), अनिल रावसाहेब चव्हाण (वय २०, दत्तनगर, राहुरी) अशी सांगितली.
पोलिसांची आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक स्टीलचा सत्तूर, एक चाकू, तीन लाकडी दांडके, पाच मोबाईल आढळले. पोलिसांनी हा मुद्देमाल व त्यांच्याकडील होंडा सिटी कार (एमएच ०२ बीडी ३०८५) असा एकूण २ लाख ५१ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे सर्व आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत जात असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आरोपींवर तोफखाना पोलिसांत भादंवि ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------
तीन आरोपींवर ३८ गुन्हे
इराणी टोळीतील आरोपी कंबर रहीम मिर्झा याच्यावर १५, जाकीर खान याच्यावर २०, तर जफर शेख याच्यावर ४ असे या तिघांवर एकूण ३८ गुन्हे धुळे, पुणे, नाशिक या जिल्ह्यांसह परराज्यातही दाखल आहेत.