७० हजार कोटींचे सिंचन आघाडीच्या घशात
By Admin | Published: September 13, 2014 10:36 PM2014-09-13T22:36:50+5:302024-03-20T13:05:34+5:30
संगमनेर : गेल्या १५ वर्षांत एकाही पैशाची गुंतवणूक न झाल्याने महाराष्ट्रातील ४३ टक्के उद्योगधंदे घटले.
संगमनेर : गेल्या १५ वर्षांत एकाही पैशाची गुंतवणूक न झाल्याने महाराष्ट्रातील ४३ टक्के उद्योगधंदे घटले. काँग्रेस आघाडीवाल्यांनी ७० हजार कोटींचे सिंचन घशात घातले, अशी टीका करीत लाल दिवा हे माझं ध्येय नाही, तर माझ्या बाबांचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी उभी आहे, असे प्रतिपादन आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी केले.
संगमनेर येथे शनिवारी जाणता राजा मैदानावर संघर्ष यात्रा सभेत आ. मुंडे बोलत होत्या. व्यासपीठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, गोविंद केंद्रे, सुरजीत ठाकूर, माजीमंत्री बबनराव पाचपुते, खासदार दिलीप गांधी, अमित पालवे उपस्थित होते. त्या म्हणाल्या, पंचायत राजपासून राजकीय पदार्पण करणारे गोपीनाथ मुंडे केंद्रीय ग्रामविकासमंत्री झाले. त्यांच्या सत्कार समारंभात भाषण करण्याची माझी इच्छा होती. पण, ३ जूनला बाबा गेले अन् मी अंध:कारात बुडाले. तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं पुढं आली म्हणून उभी राहिले. बाबांना ‘साहेब’ होण्यासाठी २० वर्षे लागली. मी १४ दिवसांत ‘ताई’ची ताईसाहेब झाले. त्यांचं स्वप्न होतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचं. ते पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे म्हणून सगळं दु:खं बाजूला ठेवून मी तुमच्यासमोर आले आहे. गृहमंत्री म्हणून बाबांच्या काळात एकही दंगल व दहशतवादी हल्ले झाले नाहीत. आता महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्य सरकार भ्रष्टाचारावर चाललं आहे. २०१२ ला महाराष्ट्र ‘लोडशेडींग’मुक्त करण्याची आघाडीची घोषणा होती. पण ते झालेच नाही. भाजपशासीत गोवा, गुजरातसारख्या सुरक्षित राज्यांमध्ये उद्योग जात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवून रोजगार देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सत्ता परिवर्तनाची गरज असून हे जुलमी सरकार उलथून टाकायचे असेल तर माझ्याबरोबर मैदानात उतरण्याची तयारी ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.
जानकर यांनी आमचं नातं भावनिक असून ते आयुष्यभर तोडणार नाही. स्वार्थ घेवून आलो नाही. ‘ताई’मागे भाऊ म्हणून उभा राहील. महाराष्ट्रात फक्त १५० लोकांची सत्ता आहे. इकडे थोरात व तिकडे विखेंचा पाळणा हलला तरच पालकमंत्री होतो. पाचपुते यांनी रावणाचा वध करण्यासाठी विभिषणाची भूमिका घेतली आहे, असे सांगून ‘ताई’च्या संघर्ष यात्रेद्वारे परिवर्तनातून आघाडी सरकार गाडले जाईल, अशी टीका जाणकर यांनी केली. दिलीप गांधी यांनी राज्यात महायुतीच्या २०० पेक्षा जास्त जागा येतील, असे भाकीत वर्तविले. याप्रसंगी विठ्ठल शिंदे, राधावल्लभ कासट, ज्ञानेश्वर कर्पे, राजेश चौधरी, प्रा. सुभाष गीते, अशोक रागीर, संजय नाकिल, साहेबराव नवले, बाबासाहेब कुटे, कैलास वाक्चौरे, अमर कतारी, संजय फड आदींसह भाजप, सेना व आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)