‘परका उमेदवार’ हाच कर्जत-जामखेडच्या प्रचाराचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 11:45 AM2019-10-06T11:45:10+5:302019-10-06T11:47:44+5:30

पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत -जामखेड मतदारसंघात ‘परका’ उमेदवार हा भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा झाला आहे. ‘बारामतीचे पवार कोठेकोठे अतिक्रमण करणार?’ अशी टीका केली जात आहे़ विखे यांनीही पवारांविरुद्ध शड्डू ठोकले आहे. स्थानिक अस्मितेच्या मुद्यावरच येथील निवडणूक होण्याची शक्यता आहे.

The issue of campaigning for Karjat-Jamkhed is the 'foreign candidate' | ‘परका उमेदवार’ हाच कर्जत-जामखेडच्या प्रचाराचा मुद्दा

‘परका उमेदवार’ हाच कर्जत-जामखेडच्या प्रचाराचा मुद्दा

कर्जत-जामखेड विधानसभा / विश्लेषण/  अण्णा नवथर ।  
अहमदनगर : पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत -जामखेड मतदारसंघात ‘परका’ उमेदवार हा भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा झाला आहे. ‘बारामतीचे पवार कोठेकोठे अतिक्रमण करणार?’ अशी टीका केली जात आहे़ विखे यांनीही पवारांविरुद्ध शड्डू ठोकले आहे. स्थानिक अस्मितेच्या मुद्यावरच येथील निवडणूक होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तरेच्या सुजय विखे यांचे दक्षिणेत काय काम? असा मुद्दा प्रचारात उपस्थित केला होता. आता विधानसभेला हाच मुद्दा कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीवर उलटला आहे. रोहित पवार यांचे कर्जत-जामखेडमध्ये काय काम? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. राम शिंदे यांसह खासदार सुजय विखे हा मुद्दा आक्रमकपणे मांडत आहेत. 
शिंदे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरताना कर्जतमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षाही हे शक्तिप्रदर्शन मोठे होते. पाऊस असतानाही ते शक्तिप्रदर्शन करण्यात यशस्वी झाले. या निवडणुकीतील जिल्ह्यातील आजवरचे हे सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन मानले जाते. ‘मी सालगड्याचा मुलगा आहे. माझे आईवडील हे काही आमदार, खासदार, मंत्री नव्हते. ते (रोहित पवार) मात्र  मालक आहेत. मालक तुमची सेवा करेल की ‘भूमिपुत्र सालगडी’ हे ठरवा’ असे भावनिक आवाहन शिंदे यांनी केले. आपल्या आई, वडिलांनाही त्यांनी व्यासपीठावर बसविले होते. 
मतदारसंघात केलेल्या विकास कामांची यादीच सभेत त्यांनी मांडली. आपण काय कामे केली ती यादी सर्व मतदारांच्या मोबाईलवर अ‍ॅपद्वारे दिलेली आहे. सूतगिरणी आणली. त्यातून वर्षभरात एक हजार तरुणांना रोजगार मिळेल. कृषी महाविद्यालय आणले. जलसंधारणात सर्वाधिक निधी आणला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत आहोत. बारामतीकरांनी नगर जिल्ह्यासाठी यापूर्वी काय दिले हे सांगावे? त्यांची सत्ता होती त्यावेळी कुकडीचा प्रश्न त्यांनी का सोडवला नाही? आपण कुकडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी निधी मंजूर केला आहे. यापुढे कृष्णाचे पाणी भीमेत व भीमेचे पाणी सीनेत आणले जाईल, असा मुद्दा शिंदे यांनी मांडला. खासदार विखे यांच्या भाषणाचा सर्व रोख हा पवार घराण्याविरुद्ध होता. पवार लोकसभेला म्हणाले की मावळची आम्हाला बारामती करायची आहे. आता कर्जत-जामखेडची बारामती करायची आहे असे सांगतात. हे कोठे-कोठे बारामती करणार आहेत व किती मतदारसंघात जाऊन अतिक्रमण करणार आहेत? राष्ट्रवादीची सत्ताच येणार नाही तर हे आश्वासने कशी पूर्ण करणार? अशी टीका त्यांनी केली. 
राष्ट्रवादी यापूर्वी मतदारसंघातील स्थानिक उमेदवार देत होती. यावेळी रोहित  यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक नेत्यांना आपली इच्छा म्यान करावी लागली आहे. पवारांच्या घरातील उमेदवार असल्याने कोणीही बंडखोरीची भाषा केलेली नाही. मात्र, राष्ट्रवादीचे सर्व नेते एकदिलाने काम करणार का? यावर पवारांची भिस्त अवलंबून आहे. राष्ट्रवादीने स्थानिक उमेदवार का दिला नाही? या प्रश्नाचेही रोहित पवार यांना प्रचारातून शंकासमाधान करावे लागणार आहे. 
रोहित पवार यांनी पुणे, बारामती येथून आपली यंत्रणा कर्जत-जामखेड मतदारसंघात कामाला लावली आहे. बारामती, पुण्याची वाहने सध्या मतदारसंघात वाढली आहेत, अशी टीका शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरताना केली. रोहित यांचे सोशल मीडियावरील जे समर्थक आहेत तेही बहुतांश पुणे जिल्ह्यातील आहेत. सोशल मीडियावरील प्रचारात त्यांचा अधिक भर आहे. रोहित यांची यंत्रणा या मतदारसंघात फिरत असल्याने विखे यांनीही आपली यंत्रणा शिंदे यांच्या मदतीला पाठवली आहे. पवारांच्या विरोधात विखे हे पूर्णत: शिंदे यांच्या मदतीला मैदानात उतरल्याचे दिसत आहे. 

Web Title: The issue of campaigning for Karjat-Jamkhed is the 'foreign candidate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.