गर्भसंस्कारामुळेच चांगली पिढी निपजते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:06 PM2019-09-21T13:06:12+5:302019-09-21T13:06:32+5:30
मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील सर्वोच्च आनंद आहे. गर्भसंस्कारामुळे चांगली संतती निपजते. गर्भवती स्त्रीने आहार, विहाराचे नियम पाळणे तसेच चांगल्या विचारांचे श्रवण करणे गरजेचे आहे.
सन्मतीवाणी
मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील सर्वोच्च आनंद आहे. गर्भसंस्कारामुळे चांगली संतती निपजते. गर्भवती स्त्रीने आहार, विहाराचे नियम पाळणे तसेच चांगल्या विचारांचे श्रवण करणे गरजेचे आहे.
जे जे महापुरुष, थोर व्यक्ती होऊन गेले. त्यांच्या मातांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. त्यामुळेच त्यांची मुले समाजात गौरवाला पात्र ठरली. सर्वत्र त्यांच्या किर्तीचा सुगंध दरवळला आहे. महावीर, प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज आदींच्या उदाहरणावरुन मातेने
केलेल्या संस्काराची महती कळते.
गर्भावस्थेत स्त्रियांनी विशेष काळजी घेण्याची गरज असते. खाण्या-पिण्यावर बंधने हवीतच. बाळाच्या पोषणाकरीता सात्विक आहारच घ्यावा. टी.व्ही., मोबाईलवर संस्कारशील कार्यक्रम पहावेत. महापुरुषांचे चांगले विचार ऐकावेत. त्याचा परिणाम गर्भातील जीवावर होतो. चांगल्या संस्कारामुळे चांगली संतती निपजते.
गर्भवतींनी कुसंगत, कुसंस्कारापासून दूर रहावे. पोटात वाढणारा जीव भविष्यात उत्तम संस्कारक्षम नागरिक व्हावा म्हणून मातेने काळजी घेणे गरजेचे आहे. आईच्या वात्सल्याची जाणीव मुलांनी ठेवावी. आईला त्रास होऊ नये म्हणून चांगले वर्तन करावे. आई, वडिलांची सेवा हे पुण्याचे काम आहे. गर्भवतींनी शरीराबरोबरच मनाचे स्वास्थ्य टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
मातेच्या सहकार्याने गर्भातील जीवाची वाढ होते. भरण, पोषण, पालन माताच करते. माता हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे. गर्भसंस्कार जाणून घ्यावेत. चांगल्या पिढीच्या निर्मितीसाठी गर्भसंस्कार आवश्यक आहेत.
- पू. श्री. सन्मती महाराज