...अशी सुरू होती दुधात भेसळ; अन्न औषध प्रशासनाचा दूध केंद्रावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 05:25 PM2021-03-03T17:25:20+5:302021-03-03T17:26:12+5:30
राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील दोन दूध संकलन केंद्रावर बुधवारी सकाळी अन्न, औषध प्रशासनाने छापा टाकून भेसळीसाठी वापरली जाणारी पावडर व भेसळयुक्त दूध जप्त केले. या कारवाईत एकूण ३६ हजार ६३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अहमदनगर: राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील दोन दूध संकलन केंद्रावर बुधवारी सकाळी अन्न, औषध प्रशासनाने छापा टाकून भेसळीसाठी वापरली जाणारी पावडर व भेसळयुक्त दूध जप्त केले. या कारवाईत एकूण ३६ हजार ६३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पथकाने शिलेगाव परिसरातील करमारवाडी येथे व्हेटरनरी डॉक्टर असलेला दिलीप रघुनाथ म्हसे याच्या मे. गोरक्षनाथ दूध संकलन केंद्रावर छापा टाकला. यावेळी तेथे भेसळीसाठी वापरली जाणारी १०० किलो व्हे पावडर व ४० लीटर व्हे पावडरचे द्रावण व ३०० लीटर दूध असा एकूण २४ हजार ९३१ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
यावेळी तेथून जवळच असलेल्या रमेश पाटीलबा म्हसे याच्या मे. म्हसे पाटील दूध संकलन केंद्राची तपासणी करण्यात आली. यावेळी तेथे १५ किलो व्हे पावडर व ३०० लीटर भेसळयुक्त दूध असा एकूण ११ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.
पथकाने भेसळयुक्त दूध, व्हे पावडर व व्हे पावडर द्रावणाचे नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. यावेळी भेसळयुक्त जागेवरच नष्ट करण्यात आले असून दोन्ही दूध संकलन केंद्र बंद करण्यात आले आहेत.
अन्न, औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस.पी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत कुटे, शरद पवार, नमुना सहायक प्रसाद कसबेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.