तीन चाकी रिक्षा चालविणे महाकठीण; सरकार कसे चालणार? सुजय विखे यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 03:02 PM2020-08-19T15:02:47+5:302020-08-19T15:03:26+5:30
खासदार डॉ.सुजय विखे यांनी श्रीरामपूर शहरात बुधवारी (१९ आॅगस्ट) रिक्षा चालविण्याचा अनुभव घेतला. रिक्षात माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्यांना बसविले. तीन चाकी रिक्षा चालविणे हे कठीण आहे. कशाचाच अंदाज येत नाही. त्यामुळे राज्यातील तीन पक्षांचे सरकार तरी कसे चालत असेल? असा टोलाही त्यांनी लगावला.
श्रीरामपूर : खासदार डॉ.सुजय विखे यांनी श्रीरामपूर शहरात बुधवारी (१९ आॅगस्ट) रिक्षा चालविण्याचा अनुभव घेतला. रिक्षात माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्यांना बसविले. तीन चाकी रिक्षा चालविणे हे कठीण आहे. कशाचाच अंदाज येत नाही. त्यामुळे राज्यातील तीन पक्षांचे सरकार तरी कसे चालत असेल? असा टोलाही त्यांनी लगावला.
मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या वतीने ३० हजार सभासदांकरिता अवघ्या पाचशे रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा उपक्रम शहरात बुधवारी सुरू करण्यात आला. त्याच्या उद्घाटनासाठी खासदार डॉ.विखे हे आले होते. त्याचवेळी एक रिक्षा चालक आपली नवी कोरी करकरीत रिक्षा खासदारांच्या भेटीला घेऊन आला. आपली रिक्षा ही प्रवाशांची वाहतूक करते. त्यात सॅनिटायझर, तसेच प्रवासी व चालकामध्ये सुरक्षितता ठेवण्यासाठी पडदा लावण्यात आला आहे. कोरोनावर जनजागृती करणारी पत्रके चिकटविण्यात आली आहेत, अशी गंमतीदार माहिती चालकाने खासदार डॉ.विखे यांनी दिली. ते पाहून खासदार भलतेच खुश झाले. त्यांना रिक्षा चालविण्याचा मोह आवरता आला नाही.
आपण स्वत: रिक्षा चालविणार अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. रिक्षातच बसूनच ते स्वत: अध्यक्ष असलेल्या मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेत गेले. त्यावेळी जि.प.सदस्य शरद नवले, माजी सभापती दीपक पटारे मागे बसले. खासदार विखे यांनी केलेल्या राजकीय टोलेबाजीमुळे उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला.
तीन चाकी रिक्षा चालविणे सोपे नाही. मागे बसणारी मंडळी जीव मुठीत धरून बसतात. रिक्षाचा तोल सांभाळून प्रवास करणे कठीण आहे. तीन चाकी रिक्षा चालवून मी सरकार चालविण्याचाच अनुभव घेतला, असा टोला त्यांनी लगावला.