पाथर्डीतील प्राथमिक शिक्षक बदलीची अवघड झाली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:23 AM2021-05-25T04:23:00+5:302021-05-25T04:23:00+5:30
पाथर्डी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी शासनाचे काही नियम आहेत. त्या अंतर्गतच असलेल्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदली निकषांना ...
पाथर्डी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी शासनाचे काही नियम आहेत. त्या अंतर्गतच असलेल्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदली निकषांना येथील गटशिक्षणाधिकारी यांनी सोईस्कररीत्या फाटा दिला आहे, अशी काही शिक्षकांची तक्रार आहे. त्यामुळे अवघड क्षेत्रातील बदलीसाठी पात्र शिक्षकांवर अन्याय झाला असून, फेरसर्वेक्षणाची मागणी त्यांच्याकडून होत आहे.
शिक्षकांच्या कामाचे भिन्न स्वरूप लक्षात घेऊन शासनाने वेळोवेळी बदलीचे निकष ठरवले आहेत. डोंगरी, नक्षलग्रस्त क्षेत्र, जास्त पर्जन्यमान किंवा संपर्क तुटणारे क्षेत्र, हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वावर असणारे क्षेत्र, वाहतूक व संवाद अशा दळणवळणाचा अभाव तसेच राष्ट्रीय महामार्गापासून १० किमी दूर असणाऱ्या शाळा अवघड क्षेत्रात येतात. अशा शाळांतून किमान तीन वर्षापासून कार्यरत शिक्षकांना सातपैकी तीन निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
चालूवर्षी पाथर्डी तालुक्यातून गटशिक्षणाधिकारी यांनी अवघड क्षेत्रातील ३३ शाळांची यादी प्राथमिक शिक्षण विभागाला सादर केली आहे. मागील वर्षीच्या सर्वेक्षणात ३६ शाळा अवघड क्षेत्र निकषात बसल्या होत्या. सादर झालेल्या अवघड क्षेत्रातील शाळांच्या सर्वेक्षणाची माहिती कोरोना लॉकडाऊनमुळे शिक्षकांना नसल्याने त्यांना नियमानुसार मुदतीत हरकती नोंदवता आलेल्या नाहीत. जुन्या सर्वेक्षणात नसणाऱ्या काही शाळांचा नव्याने समावेश झाला असला तरी काही शाळा मात्र वगळल्या गेल्या आहेत. गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच केंद्रप्रमुख यांनी प्रत्यक्षात अवघड क्षेत्र निकषांची पडताळणी केली का? याशिवाय नव्याने अवघड क्षेत्रात समावेश केलेल्या शाळा निकष पूर्ण करतात का? या मुद्द्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे. अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांच्या निकषांची यंत्रणेकडून प्रत्यक्षात तपासणीच झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात बदलीस पात्र असलेले अनेक शिक्षक सोयीच्या बदलीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे याबाबत पुन्हा पडताळणी करण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे.
--
कोरोना टाळेबंदी असल्याने अवघड क्षेत्राची स्वत: तपासणी केली नाही. मात्र केंद्रप्रमुख यांनी पाठविलेल्या माहितीच्या आधारावर पात्र शाळांची यादी सादर केली आहे.
- अभयकुमार वाव्हळ,
गटशिक्षणाधिकारी, पाथर्डी
--
शाळांना भेटी दिल्या आहेत. परंतु, निकष पूर्ण केल्याबाबतचे दाखले घेतलेले नाहीत.
- के.जी. घावटे,
केंद्रप्रमुख, टप्पा पिंपळगाव