माजी मंत्री कोल्हे यांच्यामुळेच काम करण्याची ऊर्जा मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:26 AM2020-12-30T04:26:58+5:302020-12-30T04:26:58+5:30
कोपरगाव : माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहकार क्षेत्रात साखर कारखाना चालविताना शेतकरी, मजूर, उसतोडणी कामगार, गोरगरीब आणि दीनदलितांसह ...
कोपरगाव : माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहकार क्षेत्रात साखर कारखाना चालविताना शेतकरी, मजूर, उसतोडणी कामगार, गोरगरीब आणि दीनदलितांसह सर्वच जाती-धर्माच्या लोकांसाठी काम केले. अशा नेत्याबरोबर काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. त्यांच्या सहवासात आम्ही घडत गेलो, समाजातील तळागाळापर्यंतच्या प्रत्येक घटकांसाठी काम करण्याची ऊर्जा त्यांच्यामुळेच मिळाली, असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सोमवारी (दि.२८) कोपरगाव दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाला भेट दिली. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध समस्या मांडून विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी केली.
आठवले म्हणाले, गेल्या पाच वर्षांच्या काळात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मतदारसंघातील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे. माजी मंत्री कोल्हे यांचा वारसा त्या चालवत असल्याने समाजातील तळागाळातील घटकांसाठी त्यांचे काम सुरू आहे.
यावेळी युवा नेते सुमित कोल्हे, आरपीआयचे प्रदेश सचिव विजय वाकचौरे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, रिपाइं उत्तर महाराष्टाचे अध्यक्ष राजाभाऊ कापसे, दीपक गायकवाड, जितेंद्र रणशूर आदींसह भाजप, आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
...............................
फोटो २८ कोपरगाव आठवले
कोपरगाव येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा बिपीन कोल्हे यांनी सन्मान केला.