दडपशाहीच्या मार्गाने चित्रपटावर बंदी आणणे चुकीचे; अविनाथ पाटील यांनी मांडली अंनिसची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 07:05 PM2017-11-21T19:05:24+5:302017-11-21T19:14:00+5:30
सिनेमांतील विषयांवरून वाद-विवाद, आक्षेप असू शकतात, परंतु म्हणून कलाकृतीच्या सादरीकरणाला दडपशाहीच्या मार्गाने बंदी आणणे चुकीचे आहे. सध्या चर्चेत असणा-या दुर्गा, न्यूड, दशक्रिया व पद्मावती चित्रपटांतील वादग्रस्ततेचे स्वागत असले, तरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार, अशी भूमिका अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केली.
अहमदनगर : सिनेमांतील विषयांवरून वाद-विवाद, आक्षेप असू शकतात, परंतु म्हणून चित्रपटांच्या सादरीकरणाला दडपशाहीच्या मार्गाने बंदी आणणे चुकीचे आहे. सध्या चर्चेत असणा-या दुर्गा, न्यूड, दशक्रिया व पद्मावती चित्रपटांतील वादग्रस्ततेचे स्वागत असले, तरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार, अशी भूमिका अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
सध्या काही चित्रपटांच्या विषयांवरून वादंग उठले आहेत. दुर्गा सिनेमातील स्त्रीच्या शरीराची उपभोग वस्तू म्हणून केल्या जाणा-या प्रदर्शनाच्या मुद्द्यावर, न्यूड सिनेमाच्या नावाबद्दल, दशक्रियामध्ये ब्राम्हण्य व्यवस्थेतील शोषणाबद्दल, तर पद्मावती चित्रपटात ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाच्या सादरीकरणाबद्दल आक्षेप घेतले गेले आहेत. भारतीय समाज हा चित्रपटाच्या मोठ्या प्रवाहात वावरणारा असल्याने चित्रपट व्यवसायातील चांगल्या व वाईट घडामोडींचा व समाजातील इतर संबंधित घटकांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक निकोप, संवादी असणे आवश्यक वाटते. चित्रपट बंदीला जात, धर्म व्यवस्था, त्यांचे बळकटीकरण या अंगाने अधिक गांभीर्याने पाहावे लागेल. ज्यांना भारत एकसंध नको आहे, अशा संघटना सातत्याने जातीय अस्मिता, अहंकार जागृत करून त्या समाजाला अधिकच जातीयग्रस्त करत आहेत. आज समाजात प्रत्येक जात एखाद्या मुद्द्यावरून एकटी लढत आहे आणि हे घातक आहे. यातून समूहाची एकाधिकारशाही बळकट होते. ‘पद्मावती’सारख्या चित्रपटाचा विषय जर मध्यमयुगीन असेल, तर आपली दृष्टी मध्ययुगीन ठेवून चालेल का? केवळ एक कलाकृती एवढंच महत्त्व देऊन चित्रपट पाहायला हवा. एकदा सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिल्यानंतर त्यावर पब्लिक सेन्सॉरशिप चालणार नाही. याविरोधात सर्व लेखक, कवी, कलावंतांनी एकत्र येऊन कायदेशीर लढाई लढावी लागेल. नाहीतर कोणाच्या तरी भावना दुखावल्या या सदराखाली रोजच कलेचा श्वास कोंडला जाईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीचा प्राण आहे. त्यांच्या संरक्षणासाठी अधिक आग्रही राहावे लागेल. अन्यथा, येथील जात-जमातवादी मानसिकता कलावंतांचा एम.एफ. हुसेन केल्याशिवाय राहणार नाही, असे पाटील म्हणाले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याच्या हेतूने अशा कलाकृती लोकांनी पाहाव्यात यासाठीची प्रचार मोहीम राबवणार असल्याचेही पाटील म्हणाले.