ही वेळ सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:20 AM2021-04-25T04:20:57+5:302021-04-25T04:20:57+5:30
शेवगाव : ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा देशभर आहे. रुग्णांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसताच योग्य औषधोपचार केल्यास ऑक्सिजन लागण्याची व रेमडेसिविर इंजेक्शन ...
शेवगाव : ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा देशभर आहे. रुग्णांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसताच योग्य औषधोपचार केल्यास ऑक्सिजन लागण्याची व रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची वेळ येणार नाही. लक्षणे दिसू लागताच तत्काळ उपचार केले जावे. अशा संकटसमयी सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर संकटावर मात करता येईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
शेवगाव येथे शनिवारी दुपारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीवेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आ. सुधीर तांबे, माजी आ. चंद्रशेखर घुले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे, तहसीलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके, नगर परिषद मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे, डॉ. दीपक परदेशी, आरोग्याधिकारी डॉ. सलमा हिराणी, काकासाहेब नरवडे, अरुण लांडे, डॉ. अमोल फडके आदी उपस्थित होते.
ऑक्सिजनची गरज पडण्याअगोदरच रुग्ण बरा कसा होईल, याची काळजी घ्यावी, तसेच लॉकडाऊन प्रभावीपणे, शिस्तीने पाळण्यासाठी प्रशासनाने सतर्कता दाखवावी, बाहेेेर फिरणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक धोरणाचा अवलंब करावा, गावागावात दक्षता समिती स्थापन करून लोक एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशा सूचना थोरात यांनी केल्या.
बोधेगाव येथे ५० बेड व शेवगावला जास्तीचे १०० बेड वाढवावेत, ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जि. प. अध्यक्षा घुले यांनी केली.
------
सध्या फक्त आरोग्य महत्त्वाचे...
मंत्र्यांनी बदल्यातील पैशातून काेविड सेंटर उभारावे, अशी टीका खा. डॉ. सुजय विखे यांनी श्रीगोंदा येथे केली होती. याविषयी पत्रकार परिषदेत विचारले असता थोरात म्हणाले, अशा परिस्थितीत लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. अशा वेळी कोण काय म्हणते, याला मी महत्त्व देत नाही.