स्वातंत्र्य चळवळीतील ‘जगन्नाथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 02:26 PM2019-08-18T14:26:44+5:302019-08-18T14:26:51+5:30

दुस-या महायुद्धाच्या काळात इंग्रज सरकारने वॉर फंड व युद्धासाठी सैन्यभरती करण्याच्या सूचना जगन्नाथ बारहाते यांना दिल्या़ मात्र, त्यांनी स्पष्ट नकार दिला़ त्यामुळे हा काँगे्रसवाला आहे़ राजद्रोही आहे. सरकार विरुद्ध काम करतो, अशा तक्रारी त्यांच्याविरोधात इंग्रजांकडे करण्यात आल्या़ त्यामुळे इंग्रज सरकारने प्रथम त्यांना रावसाहेब व नंतर रावबहादूर ही पदवी देऊ केली़ परंतु त्यांनी या पदव्या झुगारून पाटीलकीचा राजीनामा दिला.

Jagannath in freedom struggle | स्वातंत्र्य चळवळीतील ‘जगन्नाथ’

स्वातंत्र्य चळवळीतील ‘जगन्नाथ’

अहमदनगर : जगन्नाथ शंकरराव बारहाते हे गांधीवादी सत्यवक्ता नेते़ त्याचा जन्म १९११ मध्ये सर्वसामान्य कुटुंबात झाला़ पुणतांबा येथेच ते लहानाचे मोेठे झाले़ त्यांचे वडील पुणतांब्याचे मुलकी पाटील होते. बालपणी जगन्नाथ  बारहाते हे खोडकर होते़ त्यामुळे त्यांच्याविषयी अनेक तक्रारी व्हायच्या़ त्यामुळे वडिलांनी त्यांना पुणे येथे शिवाजी मराठा स्कूलमध्ये ठेवले. तेथे ४-६ महिने राहिले. एक दिवस शनिवारवाड्यासमोर रात्री सरदार वल्लभभाई पटेल यांची सभा होती. त्या सभेला ते वसतिगृहातून पळून गेले. तेथे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढण्याची शपथ सर्वांना दिली गेली़ त्यानंतर जगन्नाथ यांचे शाळेत लक्ष लागलेच नाही़ पुण्याचे रमेश शहा, मुंबईचे गुजराथी या मित्रांसह ते हायस्कूलमधून पळून गेले आणि स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले़ 
१९३० मध्ये ते मित्रांसमवेत संगमनेरला आले़ तेथे रामकृष्ण महाराज काँग्रेसचे कट्टर समर्थक होते. त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीत नाव नोंदण्यास सांगितले. त्याप्रमाणे वडिलांच्या संमतीचे (खोटे) पत्र देऊन काँगे्रेस कमिटीत प्रवेश केला. त्यावेळी पुण्याहून पळून गेल्याची तक्रार घरी पोहोचलीच होती. शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही आलो, असे कारण सांगून त्यांनी सुटका करवून घेतली़ स्वामी सहजानंदांनी पुणतांब्यास मिठाचा सत्याग्रह केला़ त्यात जगन्नाथ बारहाते सहभागी झाले. वडिलांना हे समजताच पोलीस अधिकाºयांना सांगून जगन्नाथ बारहाते यांना वडिलांनी घरी आणले़ त्याच साली त्यांचा विवाह लावून देण्यात आला़ 
पुढे स्वामीजींनी राहाता येथे मिठाचा सत्याग्रह केला. या सत्याग्रहातही पळून जाऊन जगन्नाथ बारहाते यांनी सहभाग घेतला़ स्वामी सहजानंद व जसराजशेठ यांना पोलिसांनी अटक केली. खटले भरले. इतर सुमारे ५० लोकांना सोडून देण्यात आले.
अकोले तालुक्यातील धामणगाव येथील डोंगरावर व तेथील जवळपासच्या जंगलात जंगल सत्याग्रह सुरु होता. या सत्याग्रहात जगन्नाथ बारहाते यांनीही सहभाग घेतला़ त्यावेळी त्यांना १ घोंगडी, काठी, मेणकापडाची पिशवी, फुटाणे, सुई, दोरा व ५ रुपये देऊन जिल्ह्यातून ५-६ लोकांना पाठविण्यात आले. तेथे कोळी ठाकर लोक, बाया, मुलांनाही पाठविण्यात आले होते़
 गावोगावची जनावरे आणून ती जंगलात सोडून जंगलावर ताबा मिळविण्यासाठी हा सत्याग्रह करण्यात येत होता़ त्यावेळी डोंगरावरील वनाधिकारी, हत्यारबंद पोलीस अधिकारी, पहारेकरी संप मोडून काढण्यासाठी धरपकड करीत व फटके मारुन सोडून देत  असत. त्यावेळी सत्याग्रहींनी मामलेदारालाच पकडून मारहाण केली़ तेथे काही 
दिवसांपूर्वीच झाडाला टांगून मामलेदाराचा खून केला होता़ त्यामुळे अधिकाºयांनी धरपकड सुरु केली़ 
अधिकाºयांच्या हाती सापडू नये, म्हणून एका झुडुपामागे काही लोक लपले होते़ त्यात जगन्नाथ बारहातेपण होते़ तेथे त्यांची पी. बी. कडू पाटील यांच्याबरोबर भेट झाली. तेथून पळून जाऊन पुतळा डोंगरावर ते लपले. तेथून त्यांचे वडील शंकर पाटील व विठोबा वहाडणे यांनी त्यांना शोधून घरी आणले. त्यांच्या वडिलांना ताप भरला होता़ आजारी स्थितीतच सर्वजण घरी आले़ त्यांच्या वडिलांना  निमोनिया झाला होता. २ ते ३ दिवसातच त्यांचे निधन झाले़
वडिलांच्या निधनानंतर त्यांनी घरची जबाबदारी स्वीकारली़ १९३६ मध्ये इंग्रज सरकारने पुणतांब्याचे मुलकी पाटील म्हणून त्यांची निवड केली़ पुढे दुसरे महायुद्ध सुरु झाले़ त्यासाठी सरकारने वॉर फंड गोळा करण्याचे आदेश मुलकी पाटलांना काढले़ तसेच सैन्य भरतीही सुरू होती. या दोन्हीची जबाबदारी जगन्नाथ बारहाते यांच्यावर इंग्रज सरकारने सोपविली. सैन्य भरतीसाठी माणसे व वॉर फंडाचे पैसा गोळा करण्यास त्यांनी विरोध केला़ त्यामुळे सरकारकडे त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली़ हा काँगे्रसवाला आहे़ राजद्रोही आहे. सरकारविरुद्ध काम करतो वगैरे. 
अशा तक्रारी त्यांच्याविरोधात इंग्रजांकडे करण्यात आल्या़ त्यामुळे इंग्रज सरकारने प्रथम त्यांना रावसाहेब व नंतर रावबहादूर ही पदवी देऊ केली़ परंतु १९३७ मध्ये त्यांनी या पदव्या झुगारून पाटीलकीचा राजीनामा दिला. १९३८ साली कोपरगाव तालुका लोकल बोर्डात ते निवडून आले. थोड्या काळापुरते ते तालुका लोकल बोर्डचे अध्यक्षही झाले. नंतर ते बोर्ड बंद करण्यात आले. कोपरगाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बरेच दिवस शांतीलाल शहा होते. एक दिवस अध्यक्ष निवडीबाबत मिटींगमध्ये विषय होता. 

बारहाते यांच्या नावाची अध्यक्षीय सूचना कोपरगावचे जंगूशेठ अजमेरे यांनी मांडली. त्याला मुकुंदशेठ गुजराथी यांनी अनुमोदन दिले. जगन्नाथ बारहाते अध्यक्ष झाले. परंतु त्यांचे मित्र त्यावेळचे काँगे्रस कमिटीचे सेक्रेटरी बाजीराव कोते, के. बी. रोहमारे,  शांतीलाल शहा यांनी काम करण्यास वेळ नसल्याचे सांगून राजीनामे दिले. ते त्यांनी स्वीकारले. नंतर माझे मित्र मला सोडत आहेत, असे सांगून जगन्नाथ बारहाते यांनीही अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
आॅल इंडिया काँग्रेसचे फैजपूर अधिवेशन अनेक अर्थांनी गाजले होते़ त्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते़ त्या अधिवेशनासही जगन्नाथ बारहाते उपस्थित होते़ तेथे अनेक नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या. स्वातंत्र्य चळवळीविषयीही अनेक निर्णय झाले़ पुढे स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक गुप्त बैठका होत असत. त्यात अनेक बैठकांना ते उपस्थित रहात असत. भूमिगत चळवळीतही त्यांचा सहभाग असायचा. चाळीसगाव ते वाघळी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रूळाच्या पिना काढून रूळ ढिले केले.
इस्लामपूरमध्ये भिकाºयाच्या वेशात फिरायचं, घरोघर जाऊन भीक मागायची आणि त्या भाकरी जमा करून जवळपास लपून बसलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना पुरवायच्या हे काम बारहाते यांच्याकडे होते. त्यानंतर वेड्या मुलाचे सोंग घेऊन तेथील कलेक्टर कधी, कोठे, कोणत्या रस्त्याने जाणार याची माहिती काढून ते जहाल क्रांतिकाºयांना पुरवित़ जहाल क्रांतिकाºयांनी एका इंग्रज कलेक्टरचा खून केला़ त्यामुळे सर्व क्रांतिकारकांना भूमिगत होण्यास सांगण्यात आले़ त्यामुळे जगन्नाथ बारहाते व त्यांचे सहकारी मुंबईला सरदार प्रतापसिंग यांच्या 
घरी गेले. काही दिवसांनी पुन्हा पुणतांब्यात आले़
भूमिगत कार्य करीत असताना ते पंधरा-पंधरा दिवस घरातून गायब रहात असत. तुम्ही कोठे जाता? काय करता हे विचारण्याचे कोणाला धाडस नव्हते. एकदा मोठे धाडस करून आमच्या आईने त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘मी कोठे गेलो तर परत येईलच याची खात्री बाळगू नका! मी भूमिगत चळवळीत आहे. कधी अटक होईल, किंवा गोळी लागेल याचा नेम नाही. परत आलो तर तुमचा, नाहीतर देशाचा समजावा! हे कोणालाही सांगू नका. तुम्ही सावध रहा!’
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ ला विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यात कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीने जगन्नाथ बारहाते यांची शिफारस केली. त्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीनेही आमच्या वडिलांची (जगन्नाथ बारहाते) शिफारस केली. परंतु प्रांतिक काँग्रेस कमिटीने त्यांना नाकारले.
 तेव्हा स्वामी सहजानंदांनी त्यांना सांगितले, ‘नेहरूजींना भेटा़ त्यांच्याशी बोला़’ स्वामींच्या सांगण्यावरून वडील पठाणकोटला नेहरूंना जाऊन भेटले. पंडितजींनी तेथेच त्यांना त्यांचे  तिकीट नक्की झाल्याचे सांगितले. त्यावेळी कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर हे तीन तालुके मिळून एक मतदारसंघ होता. वडील निवडून आल्यानंतर त्यांनी पंडित नेहरूंना कोपरगावला आणून त्यांचा मोठा सत्कार केला. त्यावेळी अनेकांनी पंडित नेहरुंबरोबर फोटो काढून घेतले. परंतु त्यांचा एकही फोटो नाही.
भाषावार प्रांत रचनेचे बिल विधीमंडळात आले, त्यावेळी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे ती आपल्या ताब्यात असावी, असे पंडितजींना वाटत होते. त्या काळातील महाराष्टÑाचे मुख्यमंत्री मोरारजीभाई यांना ती आपल्या ताब्यात हवी होती. केंद्राकडून तीन पर्याय आले. १) मुंबई केंद्रशासित असावी, २) मुंबईला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा, ३) महाराष्टÑ गुजरात मिळून द्विभाषिक मुंबई राज्य असावे़ यावर पी. के. सावंत यांनी उपसूचना मांडली. मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ करण्यात यावा. गुजरात, कर्नाटकाचा भाग काढून टाकावा. त्यावर मतदान झाले. यात महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी पक्षनेतृत्वाशीही विरोध पत्करला़ माझे वडील (जगन्नाथ बारहाते) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने होते़ पण त्यांची साधी आठवणही कोणी ठेवली नाही़
गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी अकौंटंट जगदाळे यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला. डॉ. पंजाबराव देशमुख हे एकदा कारखान्याला भेट देण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर भोजनास 
कोणाला बसवावे हा प्रश्न निर्माण झाला. सर्वांनी पाटलांना बसण्याचा आग्रह केला. त्याकाळातील भोजन पात्राच्या किमतीप्रमाणे पाटलांनी सव्वा रुपया प्रथम कारखान्याच्या तिजोरीत जमा केला व नंतरच ते भोजनास बसले, अशी आठवण जगदाळे सांगतात. अहमदनगरच्या बापूसाहेब भापकरांशी माझी एकदा भेट झाली. त्यांना मी जगन्नाथ पाटलांचा मुलगा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘एक काळ असा होता की, तळपती तलवार हातात धरणे सोपे़ परंतु तुझ्या बापाला आवरणे मोठे दिव्यच होते.’ एकदा वडिलांबरोबर मी राहात्याच्या इरिगेशन आॅफिसमध्ये गेलो. तेथे दुपारच्या वेळी एक क्लार्क टेबलावर पाय ठेवून खुर्चीवर टेकून सिगारेट ओढत बसला होता.
 कुणाला काही समजण्यापूर्वीच वडिलांनी एक जोरदार थप्पड त्याच्या गालावर लगावली. तो खुर्चीवरून खाली पडला. आॅफिसमध्ये एकच गोंधळ उडाला. मोठ्या साहेबांपासून तर आॅफिसमधील सर्व लोक वडिलांची माफी मागत होते. त्यावेळी ते वृद्ध झालेले होते़ कोणत्याही पदावर नव्हते. पण तरुणपणात जो आवेश होता, तोच आवेश वृध्दापकाळातही कायम होता. त्यामुळेच त्यावेळीही त्यांची सरकारी अधिकाºयांमध्ये चांगलीच जरब होती़


- चंद्रकांत जगन्नाथ बारहाते(मुक्त लेखक)

Web Title: Jagannath in freedom struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.