आदिवासी महिलांचा घरोघर जात देवीचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 04:37 PM2017-09-28T16:37:21+5:302017-09-28T16:38:08+5:30
आपल्या गावची प्रथा सांभाळत अकोले तालुक्यातील शिंगणवाडी येथील महिला आपल्या आदिवासी भाषेतील देवीची गाणे गात देवीचा जागर करत आहेत.
राजूर : आपल्या गावची प्रथा सांभाळत अकोले तालुक्यातील शिंगणवाडी येथील महिला आपल्या आदिवासी भाषेतील देवीची गाणे गात देवीचा जागर करत आहेत.
याबाबत या महिलांशी सवांद साधला असता त्यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून आमच्या गावातील महिला नवरात्रात घरोघर जात देवीची गाणी गातात. ही परंपरा कायम ठेवली असून आम्ही दोन दिवसांपासून खेड्यापाड्यात फिरत आहोत. याची सुरुवात आम्ही रंधा येथील घोरपडा आईच्या दर्शनाने केली. यानंतर परिसरातील गावांमध्ये आम्ही घरोघर फिरत देवीची गाणे गात आहोत. खेड्यातील लोक आम्हाला या बदल्यात धान्य देतात. राजूरकर आम्हाला देवीच्या नावाने थोडीफार देणगी देतात. जमा होणाºया धान्याचा व पैशाचा आम्ही दस-याच्या दिवशी शिंगणवाडी येथील आमच्या देवीच्या मंदिरासमोर स्वयंपाक करुन देवीला नैवद्य दाखवतो. गावकरी यात सहभागी होतात, असे लक्ष्मी पोकळे, बुगाबाई गांगड, सुमती पोकळे, जया पोकळे या आदिवासी महिलांनी सांगितले. प्रवासासाठी गावातीलच अनिल सोनवणे यांच्या वाहनांची मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
काठ्यांच्या तालावर धरतात फेर
सकाळीच आपल्या गावातून या बारा आदिवासी महिला घराबाहेर पडतात. हातात दोन लाकडी काठ्या घेत या काठ्यांच्या तालावर फेर धरून आदिवासी भाषेतील देवीची गाणी त्या सादर करतात. त्यांची ही गीते ऐकून नागरिक त्यांना स्वखुशीने देणगी किंवा धान्य देत असतात. याबाबत त्या कोणालाही सक्ती करीत नाहीत, हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे.