शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सुकाणू समितीची जागर यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 09:26 PM2018-02-24T21:26:31+5:302018-02-24T21:27:25+5:30
शेतक-यांच्या कर्जमाफीची फसवी घोषणा करून सरकारने शेतक-यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती महिनाभर राज्यभरात जनजागृती करणार आहे.
अहमदनगर : शेतक-यांच्या कर्जमाफीची फसवी घोषणा करून सरकारने शेतक-यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती महिनाभर राज्यभरात जनजागृती करून शेतक-यांनी रुपयाचेही कर्ज भरू नये, असे आवाहन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा सुकाणू समितीचे ज्येष्ठ सदस्य रघुनाथदादा पाटील यांनी दिली.
या जागर यात्रेची नियोजन बैठक शनिवारी नगरमध्ये सरकारी विश्रामगृहावर झाली. त्यात पाटील यांनी आंदोलनाची रूपरेषा विशद केली. शेतमालाला दमडीचा भाव देऊन आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी शेतक-यांची लूट केली. त्याचाच उद्रेक म्हणून १ जूनला महाराष्ट्रात शेतकरी बंद झाला. या बंदमुळे हादरलेल्या सरकारने घाईघाईत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यात शेकडो अटी टाकल्या. गेल्या दहा महिन्यांपासून या कर्जमाफीचा घोळ सुरूच आहे. आपले नाव कर्जमाफीच्या यादीत आले नाही म्हणून या दहा महिन्यांत राज्यात तीन हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे आता सुकाणू समितीने संपूर्ण कर्जमाफीचा विडा उचलला आहे.
सुकाणू समिती शहीद दिनापासून (२३ मार्च) राज्यव्यापी हुतात्मा अभिवादन व शेतकरी जागर यात्रा काढणार आहे. महिनाभराच्या या जागर यात्रेत एकाही शेतक-याने पीक कर्ज, तसेच शेतीचे वीजबिल भरू नये, असे आवाहन केले जाईल. उलट सरकारने शेतक-यांना आतापर्यंत कमी भाव देऊन जी लूट केली, ती लूट परत करावी, अशी मागणी सरकारकडे केली जाईल. या यात्रेत राज्यातील ३० जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन, हुतात्मा स्मारकांना भेटी, तसेच जिल्हानिहाय शेतक-यांच्या सभा होणार आहेत. सांगलीपासून जागर यात्रेस प्रारंभ होऊन पुणे येथे समारोप होणार आहे. दि. २१ एप्रिलला ही जागर यात्रा नगरला येणार असल्याचेही पाटील म्हणाले.
बैठकीस शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख बाळासाहेब पटारे, गणेश जगताप, प्रा. सुशीला मोराळे, किशोर ढमाले, कॉ. बाबा आरगडे, बच्चू मोढवे, विष्णूपंत ढवळे, नितीन पटारे, विलास कदम, युवराज जगताप, जगन्नाथ कोरडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.