जय अंबे, जय जगदंबे, जय मातादी.. या घोषणांनी मोहटादेवी परिसर दुमदुमला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 02:30 PM2019-09-29T14:30:50+5:302019-09-29T14:31:24+5:30
मोहटादेवी गडावर रविवारी सकाळी मंगलमय वातावरणात, मंत्रोच्चाराच्या जयघोषात नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक भिल्लारे व त्यांच्या पत्नी अस्मिता भिल्लारे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी जय अंबे,जय जगदंबे, जय मातादी.. या घोषणांनी मोहटादेवी परिसर दुमदूमून गेला होता.
पाथर्डी : तालुक्यातील मोहटादेवी गडावर रविवारी सकाळी मंगलमय वातावरणात, मंत्रोच्चाराच्या जयघोषात नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक भिल्लारे व त्यांच्या पत्नी अस्मिता भिल्लारे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी जय अंबे,जय जगदंबे, जय मातादी.. या घोषणांनी मोहटादेवी परिसर दुमदूमून गेला होता.
रविवारी सकाळी सहा ते आठ गणपती पूजन करण्यात आले. घटस्थापनेचा महासंकल्प करण्यात आला. त्यानंतर मोहटे गावातून देवीच्या मुखवट्याची सुवर्ण अलंकारासह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीसमोर रेणुका विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लेझीम पथक, झांज पथक, ढो्रल पथक सादर केले. मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घटस्थापनेला प्रारंभ करण्यात आला. पौराहित्य शरददेवा कोतनकर, विवेक मुळे, बबनदेवा कुलकर्णी, भूषणदेवा साखरे व बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. यावेळी औरंगाबाद येथील न्यायाघीश श्रीकांत कुलकर्णी, सर्व विश्वस्त, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणगांव देवी, चौंडेश्वरी मंदिर, गाडगेआई मंदिर, तिळवण तेली समाज मंदिर येथेही घटस्थापना करण्यात आली.
भाविकांच्या गर्दीने रस्ते फुलले
शनिवारी रात्रीपासून अहमदनगर-पाथर्डी तसेच शेवगाव-पाथर्डी हे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. बहुसंख्य भाविक हे पायी चालत आले होते. शनिवारी दुपारी नगरहून निघालेले भाविक सकाळी गडावर पोहोचले. राज्याच्या विविध जिल्ह्यातील भाविक गडावर येवून पेटती ज्योत घेवून जात होते. विशेष म्हणजे ही पेटती ज्योत घेवून तरूण पायी चालत आपल्या गावाकडे जात असताना दिसून आले. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे गडावर भाविकांची गर्दी वाढल्याचे दिसून आले.