श्रावणमासानिमित्त गंगास्रानासाठी गेलेल्या चुलत भावांंना जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 08:14 PM2020-08-10T20:14:02+5:302020-08-10T20:14:37+5:30
श्रावण मासानिमित्त गंगा स्नानासाठी गेलेल्या दोन तरुणांंना गोदावरी नदीपात्रात जलसमाधी मिळाली. ही घटना सोमवारी सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगांव येथे घडली.
श्रीरामपूर : श्रावण मासानिमित्त गंगा स्नानासाठी गेलेल्या दोन तरुणांंना गोदावरी नदीपात्रात जलसमाधी मिळाली. ही घटना सोमवारी सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगांव येथे घडली.
सचिन वानखेडे (वय २८) व भाऊराव वानखेडे (वय ३५, रा. दोघे महाकाळवाडगांव ) अशी जलसमाधी मिळालेल्या तरुणांची नावे आहेत. हे तरुण गोदावरी नदीपात्रात श्रावणी सोमवारनिमित्त गोदावरी नदीमध्ये गंगा स्नानासाठी गेले असता नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते नदीत वाहून गेले.
गोदावरी नदीपात्रात सोमवारी सकाळपासून शोधकार्य सुरु होते. भाऊराव वानखेडे याचा मृतदेह सापडला आहे. तर सचिन वानखेडे यांचा मृतदेह दुपारी २ वाजता मिळून आला. नाशिक परिसरात झालेल्या पावसामुळे सध्या गोदावरी नदी दुभडी भरुन वाहत आहे. वाहत्या पाण्याचा अंदाज आल्यामुळे दोन्ही तरुण पाण्यात बुडाले. सचिन व भाऊराव वानखेडे हे दोघे चुलत भाऊ असून दोघे विवाहीत आहेत.
सचिन मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील तर भाऊरावच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली, आई, वडील असा परिवार आहे.