स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्यानं जळगावच्या मामा-भाच्यांना श्रीगोंद्यात लुटलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:16 PM2018-04-14T14:16:48+5:302018-04-14T14:17:27+5:30
स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून जळगावच्या मामा-भाच्यांना काल बेदम मारहाण करत तीन लाख रुपयांना चोरट्यांनी लुटले. काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहराजवळील घायपातवाडी येथील जंगलात ही घटना घडली. जळगाव जिल्ह्यामधील चोपडा तालुक्यातील मोठा भोईवाडा येथील मनतेजर अली मुजाफ्फर अली सय्यद व बिस्मिला शेख या दोघांना बेदम मारहाण करत २ लाख ९० हजारास लुटले.
श्रीगोंदा : स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून जळगावच्या मामा-भाच्यांना काल बेदम मारहाण करत तीन लाख रुपयांना चोरट्यांनी लुटले. काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहराजवळील घायपातवाडी येथील जंगलात ही घटना घडली. जळगाव जिल्ह्यामधील चोपडा तालुक्यातील मोठा भोईवाडा येथील मनतेजर अली मुजाफ्फर अली सय्यद व बिस्मिला शेख या दोघांना बेदम मारहाण करत २ लाख ९० हजारास लुटले. याबाबत अली यांच्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आचारी काम करणारे मनतेजर सय्यद यांची सहा महिन्यांपूवी चोपडा येथे श्रीगोंदा शहरातील एका नितीन नावाच्या या व्यक्तीशी ओळख झाली. यावेळी नितीन याने ‘‘ अर्धा किलो सोने सापडलेले आहे. ते विकायचे असून मी तुम्हाला बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीने सोने घेऊन देतो’’ असे सांगितले. मात्र सय्यद यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी मामा बिस्मिला शेख (रा. शिवाजीनगर, उस्मानिया पार्क, जळगाव) यांना नीतीनची ओळख करून दिली. नितीन नावाच्या व्यक्तीने शेख यांना निम्म्या किमतीत सोने देतो, असे सांगितले. त्यावर नितीनने तुम्ही एकदिवस श्रीगोंद्याला येऊन सोने पहा, असे सांगितले. त्यानुसार ५ एप्रिल रोजी सय्यद व त्यांचे मामा शेख हे श्रीगोंद्याला आले. नितीन नावाच्या व्यक्तीने अंगठ्या दाखवल्या. सोने खरे असल्याची खात्री झाल्यानंतर सय्यद व शेख या दोघांनी आम्हाला एवढे सोने नको. आमच्याकडे २ लाख ९० हजार एवढीच रक्कम असून तेवढेच सोने घ्यायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर शुक्रवार (दि.१३) रोजी सकाळी शेख व सय्यद हे पैसे घेऊन जळगावहून श्रीगोंद्याला आले. तिथून ते राजा नावाच्या मुलासोबतदुचाकीवर बसून मांडवगण रस्त्याने घायपातवाडी जंगलामधील चारीजवळ गेले. तेथे तीन व्यक्ती बसलेल्या होत्या. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नितीन व दोन अनोळखी व्यक्ती होत्या. शेख व सय्यद यांनी त्या लोकांना सोन्याची मागणी केल्यानंतर पितळी पातेले दाखवले. त्यात पिवळ्या धातूच्या अंगठ्या होत्या. परंतु त्या नकली असल्याचे लक्षात आल्यामुळे या दोघांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी नितीन व तीन अनोळखी साथीदारांनी या दोघांचा पाठलाग करत मारहाण करून शेख यांच्याकडील २ लाख ९० हजाराची रक्कम बळजबरीने चोरून नेली.