जामखेड नगरपरिषद निवडणुकीत प्रमुख पक्षांना अपक्ष नडणार ?
By Admin | Published: December 23, 2015 11:19 PM2015-12-23T23:19:16+5:302015-12-23T23:24:59+5:30
जामखेड : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सहाव्या दिवसाअखेर एकाही अपक्षाने माघार न घेतल्याने राजकीय पक्षांना अपक्षच नडणार, अशी चर्चा शहरात रंगली आहे़
जामखेड : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सहाव्या दिवसाअखेर एकाही अपक्षाने माघार न घेतल्याने राजकीय पक्षांना अपक्षच नडणार, अशी चर्चा शहरात रंगली आहे़ पुढील चार दिवस सुट्ट्या असल्यामुळे सोमवारी शेवटचा दिवस अर्ज मागे घेण्यासाठी उरला आहे़ त्यामुळे अपक्षांवर सोमवारी कोणाची जादू होणार? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे़ तर किती जणांना स्वीकृत नगरसेवक करणार? असा प्रश्न अपक्ष उपस्थित करीत आहेत़ अपक्षांची ही ताठर भूमिका महायुती, राष्ट्रवादी व काँगे्रससाठी डोकेदुखी ठरत आहे.
जामखेड नगरपरिषदेसाठी १६० जणांचे २०८ उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत. त्यापैकी ४८ जणांचे दुबार अर्ज आहेत. त्यांनी दोन प्रभागात अर्ज भरले आहेत.
महायुती व राष्ट्रवादी आघाडीने प्रभागनिहाय अपक्षांची यादी तयार केली आहे. कोणामुळे तोटा होऊ शकतो व कोणामुळे लाभ होईल, याचे आडाखे बांधले जात आहेत़ अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवाराला अर्ज माघारीसाठी स्वीकृत नगरसेवक तर काहींना आर्थिक आमिष दाखविले जात आहे़ तर विरोधकांना अडचणीच्या ठरणाऱ्या अपक्षाला आर्थिक पाठबळ देऊन निवडणूक लढविण्याची गळ घातली जात आहे़ पहिल्याच निवडणुकीत अपक्षांची संख्या वाढल्यामुळे राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे़ जातीची गणिते मांडून इतरांपेक्षा आपणच प्रबळ असल्याचा दावा अनेक अपक्षांकडून केला जात आहे़ त्यामुळे अर्ज मागे घेण्यास इच्छुक कोणीही दिसून येत नाही़ आता सलग चार दिवस सुट्ट्या आहेत. काही अपक्ष अर्ज मागे घेण्याच्या कटकटीपासून मुक्ती मिळावी, म्हणून चार दिवसाच्या सहलीला निघाले आहेत. सलग चार दिवसाच्या सुट्टीनंतर एकच दिवस अर्ज मागे घेण्यासाठी राहणार आहे. त्यामुळे या चार दिवसात अपक्षांचे अर्ज काढण्यात काय जादू घडते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
(तालुका प्रतिनिधी)