जामखेड गृपने पूर्ण केली सर्वात उंच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 05:45 PM2018-09-18T17:45:11+5:302018-09-18T17:45:26+5:30
जगातील सर्वात उंच १२ हजार फूट उंचीवरील, २३ देशातील स्पर्धकांचा सहभाग असलेली आणि कमी आॅक्सिजन असलेल्या लद्दाख येथील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जामखेडमधील सहा जणांच्या टिमने पूर्ण केली.
जामखेड : जगातील सर्वात उंच १२ हजार फूट उंचीवरील, २३ देशातील स्पर्धकांचा सहभाग असलेली आणि कमी आॅक्सिजन असलेल्या लद्दाख येथील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जामखेडमधील सहा जणांच्या टिमने पूर्ण केली. २१ किमी आणि ७ किमी अंतराच्या स्पर्धेत सहभाग घेत यशस्वीपणे पूर्ण करत मेडल मिळवले.
जामखेड मॅरेथॉन गृपचे डॉ. पांडुरंग सानप यांच्या नेतृत्वाखाली प्राचार्य आप्पासाहेब शिरसाट, डॉ. दिनेश रसाळ, डॉ. अशोक बांगर, डॉ. प्रविण मिसाळ, डॉ. राजकुमार सानप आणि तलाठी इराप्पा काळे यांनी बर्फाळ व डोंगराळ प्रदेशात, कमी आॅक्सीजन असलेल्या लद्दाख येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आॅनलाईन फॉर्म भरले. स्पर्धेचे स्थान निश्चित झाल्यानंतर लद्दाखला ९ सप्टेंबर रोजी पोहचले.
१० सप्टेंबर रोजी सकाळी या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत जामखेडचे मॅरेथॉन गृप सहभागी झाला. चढउताराचा हा डोंगरी भाग असलेल्या ठिकाणी २३ देशातील स्पर्धकांसह देशातील सहा हजार स्पर्धक सहभागी झाले होते. डॉ. सानप यांनी २१ किमी मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेत अंतर अडीच तासात पूर्ण केले. अप्पासाहेब शिरसाट, डॉ. रसाळ, डॉ. बांगर, डॉ. मिसाळ, सानप व काळे यांनी ७ किमी स्पर्धेत सहभागी होत हे अंतर ३५ मिनिटांत पूर्ण केले.
जामखेड येथील मॅरेथॉन ग्रुपचे सदस्य मागील दोन वर्षापासून मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा पूर्ण करतात. या ग्रुपमध्ये डॉ. पांडुरंग सानप हे नेहमी २१ कि.मी. स्पर्धेत सहभागी होऊन अल्प कालावधीत शर्यत पूर्ण करतात. मेडल मिळाले नाही तरी सहभागाचा आनंद घेतात. जामखेड येथील औद्योगिक वसाहतीची असलेली खुली ४० एकर क्षेत्रात जामखेड मॅराथॉन गृप दररोज सराव करतो. ‘लोकमत’ आयोजीत औरंगाबाद मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला होता.