जामखेडचे नगराध्यक्ष निखिल घायतडक राजीनामा देणार; पडद्यामागच्या हालचाली वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 04:14 PM2020-06-05T16:14:53+5:302020-06-05T16:16:50+5:30
जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे ते मंगळवारी जिल्हाधिका-यांकडे राजीनामा सादर करणार आहेत. त्यास नगराध्यक्ष घायतडक यांनीही दुजोरा दिला आहे. यामुळे पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
जामखेड : जामखेड नगरपरिषदेचे भाजपचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे ते मंगळवारी जिल्हाधिका-यांकडे राजीनामा सादर करणार आहेत. त्यास नगराध्यक्ष घायतडक यांनीही दुजोरा दिला आहे. यामुळे पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दोन वर्षापूर्वी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी होते. भाजपचे तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांनी सव्वा वर्षे निखिल घायतडक व सव्वा वर्ष विद्या वाव्हळ यांना संधी देण्याचे ठरवले होते. विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा पराभव झाला. यामुळे नगराध्यक्ष बदलाचे वारे तूर्त थांबले होते. फेब्रुवारी महिन्यात विषय समितीच्या निवडी होणार होत्या. परंतु त्या नगराध्यक्षांनी राजीनामा न दिल्यामुळे लांबल्या होत्या. मार्च महिन्यात शिंदे यांनी चौंडी येथे घायतडक यांचा राजीनामा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवड प्रक्रिया थांबली होती. दरम्यान, आता घायतडक यांच्या राजीनाम्यानंतर उर्वरित सहा महिन्यांसाठी विद्याताई ओव्हळ यांची बिनविरोध निवड होणार असल्याची चर्चा राजकीय गोटात आहे.
जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा मी मंगळवारी राजीनामा देत आहे. तसेच इतर नगरसेवक राजकीय दबावापोटी राजीनामा देणार आहे.
-निखिल घायतडक, नगराध्यक्ष, जामखेड.