जामखेडमध्ये एकाच दिवशी दोघांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:08 PM2018-09-11T12:08:59+5:302018-09-11T13:20:39+5:30

फायनान्स कंपनीच्या कर्मचा-याला जामखेड तालुक्यातील आघी- करमाळा रस्त्यावर मोटारसायकल अडवून मारहाण करून रोख २ लाख ३२ हजार रुपयांची बॅग पळवून नेली.

At Jamkhed, they robbed both of them on the same day | जामखेडमध्ये एकाच दिवशी दोघांना लुटले

जामखेडमध्ये एकाच दिवशी दोघांना लुटले

जामखेड : फायनान्स कंपनीच्या कर्मचा-याला जामखेड तालुक्यातील आघी- करमाळा रस्त्यावर मोटारसायकल अडवून मारहाण करून रोख २ लाख ३२ हजार रुपयांची बॅग पळवून नेली. तर दुस-या घटनेत आय.टी.आय. जवळ ट्रक चालकास बंदुकीचा धाक दाखवून लुटले. दोन्ही प्रकरणात एकूण सहा जणांच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ९ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजता रेवन्नाथ हनुमंत सालगुडे (वय - ३१ रा- करमाळा) हे आपल्या फायनान्स कंपनीचे पैसे गोळा करण्यासाठी करमाळा येथून जामखेड तालुक्यात आले होते. सकाळी त्यांनी परीसरातील धोंडपारगाव, पिंपरखेड, हळगाव, येथील फायनान्सच्या खातेदारांचे पैसे गोळा करून आपल्या (एम. एच- ४५, एम- २२१०) या मोटारसायकल वरुन आघी - करमाळा रोडने जात होते. याचवेळी दोन अनोळखी इसम लाल रंगाच्या बिगर नंबरच्या पल्सर मोटारसायकलवरून तोंडाला काळ्या रंगाचा कपडा बांधून आले. मोटारसायकलला त्यांची गाडी आडवी लावून थांबवत लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. सालगुडे यांच्याजवळील २ लाख ३२ हजार ५५० रुपयांची लाल रंगाची बॅग हिसकाऊन मोटारसायकलवरून पळून गेले. याप्रकरणी दोन जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना ही जामखेड शहराजवळच करमाळा रस्त्यावरील आय. टी. आय भागात घडली. प्रदर्शन संदिपान संत, (वय-२९ रा.भोजगाव. ता गेवराई, जि, बीड) हे १० सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जामखेड - करमाळा रोडवरून सळईने भरलेला ट्रक (एम. एच.- ०४, जी. एफ.- ३५६) हा घेऊन करमाळा मार्गे नातेपुते या ठिकाणी जात होते. याचवेळी एक पांढ-या रंगाच्या बिगर नंबरच्या चार चाकी इंडीका कारमधून चार इसम आले. त्यांनी आपली चार चाकी गाडी ट्रकला आडवी लावली. प्रदर्शन संत यांना पिस्तूल चा धाक दाखवून ट्रक ची काच फोडली. ट्रकचालकाच्या जवळ आसलेले साडेसहा हजार रुपये घेऊन आरोपी चारचाकी वाहनाने पळून गेले. या प्रकरणी चार जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नऊ महिन्यांपुर्वी लुटले होते दागिने
नऊ महिन्यांपूर्वी म्हणजे ९ डिसेंबर २०१७ रोजी पुणे येथुन मेव्हणीच्या लग्नसमारंभासाठी चाललेल्या नायगाव येथील कुटुंबीयांची कार खर्डा रोडवरील दरडवाडी या ठिकाणी अडवली होती. सहा दरोडेखोरांनी महीलांच्या अंगावरील दागिने ओरबडुन पावणेदोन लाख रुपयांंचा एवज चोरुन नेला होता. खर्डा रोड व करमाळा रोडवर लुटमारीच्या सारख्या घटना घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: At Jamkhed, they robbed both of them on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.