जामखेडकरांना दिलासा; उद्यापासून उठणार हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 01:33 PM2020-05-10T13:33:07+5:302020-05-10T14:29:27+5:30
जामखेड : शहरात नगर जिल्ह्यात पहिला व सर्वाधिक १७ कोरोनाचे रुग्ण सापडले होते. आता अवघे पाच कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावरील उपचार अंतिम टप्प्यात आहे. २६ एप्रिल ते १० मे पर्यंत तेरा दिवस एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे शहरातील महिनाभरापासून असलेले हॉटस्पॉट सोमवारपासून उठविण्यात आले आहे. तसा आदेशही प्रशासनाने रविवारी (दि.१० मे) जारी केला आहे.

जामखेड शहरात २८ मार्च ते २६ एप्रिल या काळात १७ करोनाचे रुग्ण आढळले होते. १७ रुग्णांपैकी दोन परदेशी नागरिक होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील स्थानिक १५ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील एक जणाचा मृत्यू झाला आहे. त्यातील दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पाच जण उपचार घेत असून आहेत. पुढील आठ दिवसात जामखेड तालुका कोरोनामुक्त होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. १७ कोरोनाग्रतांच्या संपर्कात आलेल्या एकूण १८३ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आता ७३ जण क्वारंटाईनमध्ये आहेत.
जिल्हाधिका-यांनी १० एप्रिल रोजी जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र म्हणून जाहीर केले होते. येथील रूग्ण संख्या वाढत गेली. त्याप्रमाणेच हॉटस्पॉटची मुदत तीन वेळा वाढवून १० मे पर्यंत केली होती. त्याची मुदत रविवारी रोजी संपत आहेत. गेल्या एक महिन्यापासून हॉटस्पॉट असलेल्या जामखेड शहरात नागरिकांचे हाल झाले. मात्र प्रशासनाने शासनाने दिलेल्या नियमांचे कठोर पालन केल्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मोलाची मदत झाली असून शहराची कोनोरोमुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे.
तहसीलदार विशाल नाईकवाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, अवतारसिंग चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.युवराज खराडे या सात कर्त्यव्यदक्ष अधिकारी व त्यांच्या सर्व टीमने जामखेडकरांसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर कोरोनाशी लढा दिला आहे. त्याचे फलित म्हणूनच कोरोनाची साखळी तुटण्यास प्रशासनाला यश आले आहे.