जामखेडची शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात; २१ लाखाला घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 06:22 PM2020-01-28T18:22:08+5:302020-01-28T18:23:27+5:30
नायजेरियन गुन्हेगारांनी जामखेड येथील एका शिक्षिकेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून तिला तब्बल २१ लाख ४१ हजार २७५ रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
अहमदनगर : आॅनलाईन फसवणुकीत माहिर असलेल्या नायजेरियन गुन्हेगारांनी जामखेड येथील एका शिक्षिकेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून तिला तब्बल २१ लाख ४१ हजार २७५ रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
याबाबत सदर शिक्षिकेने येथील सायबर पोलीस ठाण्यात सोमवारी (दि़२७) दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. मार्क हॅरिल्युके याच्यासह एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मार्क हॅरिल्युके असे नाव धारण केलेल्या व्यक्तीने ११ जानेवारी रोजी सदर शिक्षिकेस फेसबुकवरून फ्रेंडरिक्वेस्ट पाठविली़. त्यानंतर शिक्षिकेचा विश्वास संपादन करून तिचा व्हॉटस्अॅप नंबर घेतला. युनायटेड किंगडम येथे स्थायिक असल्याने डॉ. मार्क याने सदर शिक्षिकेस सांगितले होते. पुढे फेसबुक, व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून दोघांचा संवाद सुरू झाला. या संवादातून मैत्री झाली आणि सदर शिक्षिकेने तिच्या कुटुंबाविषयी माहिती शेअर केली़. एक दिवस डॉ. मार्क याने तुमच्या मुलासाठी मी यूके येथून लॅपटॉप आणि मोबाईलचे गिफ्ट पाठवित असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी सदर शिक्षिकेस दिल्ली येथून एका महिलेने फोन केला. तिने दिल्ली विमानतळावरून कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगितले़. ‘तुमच्या नावे यूके येथून एक गिफ्ट आले असून तपासणीदरम्यान त्यात ५० हजार पाउंड स्कॅन झाले आहेत. आपण परदेशातून भारतात काळा पैसा मागितला आहे. त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो़, अशी धमकी दिली. यातून सुटका करून घ्यावयाची असेल तर तुम्हाला वेगवेगळे टॅक्स भरावे लागतील, असे सांगितले़. गुन्हा दाखल होण्याच्या धमकीने घाबरून गेलेली शिक्षिका पैसे भरण्यास तयार झाली. त्यानंतर त्या दिल्लीच्या महिलेने दिलेल्या विविध बँक खात्यावर या शिक्षिकेने २१ लाख ४१ हजार रुपये भरले़. पैसे भरल्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे तिच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, राहुल गुंडू, दिगंबर कारखिले, अभिजीत अरकल, उमेश खेडकर, मल्लिकार्जुन बनकर, विशाल हुसळे, विशाल अमृते आदींचे पथक तपास करीत आहेत.