कर्जतमध्ये एसटी डेपोसाठी जागरण गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:11 PM2018-01-22T12:11:19+5:302018-01-22T12:13:21+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्जत येथील बस डेपोसाठी सोमवारी सकाळपासून ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व नागरिकांच्यावतीने कर्जत बस स्थानकावर धरणे आंदोलन व जागरण गोंधळ घालण्यात आला.
कर्जत : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्जत येथील बस डेपोसाठी सोमवारी सकाळपासून ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व नागरिकांच्यावतीने कर्जत बस स्थानकावर धरणे आंदोलन व जागरण गोंधळ घालण्यात आला.
जलसंधारणमंत्री व पालकमंत्री राम शिंदे यांचा हा मतदारसंघ असून, १ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कर्जत बस डेपोची घोषणा होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात बस डेपो मंजूर करा, अशा घोषणाही विद्यार्थ्यांनी दिल्या होत्या.
गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत बस डेपोसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, शासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे सोमवारी सकाळपासून कर्जत बस स्थानकातच ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व नागरिकांच्यावतीने धरणे आंदोलन सुरु करण्यात आले. तसेच जागरण गोंधळ घालून बस डेपोच्या कामासाठी पैसे गोळा करुन सरकारचा निषेध करण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हरिश्चंद्र काळे, छाया पडवळकर, शाहजान सय्यद, शोभा पवार, जयसिंग निंबोरे, निवृत्ती गिरी, बबन तपसे, रमेश थोरात, किसन शिंदे, बाबा भैलुमे, दामु बादल आदींनी सहभाग घेतला.