सुपा औद्योगिक वसाहतीतील जपानी पार्कची उभारणी रेंगाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 07:13 PM2018-06-17T19:13:15+5:302018-06-17T19:19:25+5:30
पारनेर तालुक्याच्या विकासासाठी १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सुपा औद्योगिक वसाहतीचे भूमिपूजन केले. सुपा परिसरासह तालुक्याच्या विकासाची गाडी गतिमान करण्यासाठी विस्तारित सुपा औद्योगिक वसाहतीत जपानी पार्कची उभारणी करण्याचा संकल्प करण्यात आला परंतु नंतरच्या काळात या जपानी पार्कची उभारणी रेंगाळली.
शिवाजी पानमंद
सुपा : पारनेर तालुक्याच्या विकासासाठी १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सुपा औद्योगिक वसाहतीचे भूमिपूजन केले. सुपा परिसरासह तालुक्याच्या विकासाची गाडी गतिमान करण्यासाठी विस्तारित सुपा औद्योगिक वसाहतीत जपानी पार्कची उभारणी करण्याचा संकल्प करण्यात आला परंतु नंतरच्या काळात या जपानी पार्कची उभारणी रेंगाळली.
पारनेर तालुक्यतील राजकीय नेतेमंडळी आपल्या गटबाजीच्या राजकारणात अडकली तर सरकारी यंत्रणा नेहमीप्रमाणे आपल्या धिम्यागतीने वाटचाल करीत असल्याने जपानी पार्कची उभारणी रेंगाळली आहे. विस्तारित सुपा औद्योगिक वसाहतीसाठी वाघून्डे, आपधुप, पळवे, बाबूर्डी या गावातील ९४६.७० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून त्यात जपानी पार्कसाठी २३३ हेक्टर जमीन राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. आतापर्यंत २०० हेक्टर वर जमिनीचे संपादन करण्यात आले असून उर्वरित भूसंपादन प्रक्रिया नेहमीच्या सरकारी पद्धतीने सुरू आहे तालुक्यातील विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांत असणारी गटबाजी संपवण्यातच त्यांची शक्ती खर्च होत असल्याने एम आय डी सी कडे लक्ष देण्यास फुरसत मिळत नाही.
जपानी पार्कमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उद्योजक व त्यांच्या शिष्टमंडळाने भेटी देऊन माहिती घेतली परंतु त्यात पुढे काही प्रगती झाली नसल्याचे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. सुरवातीला भूसंपदानास विरोध होत असताना तत्कालीन प्रांताधिकारी संतोष भोर व औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी रामदास खेडकर या उभयतांनी शेतक-यांच्या बैठका घेऊन चर्चा करून त्यांचे मतपरिवर्तन करून भूसंपादन प्रक्रिया गतिमान केली होती. या दोन्ही अधिका-यांच्या बदल्या झाल्या व प्रक्रिया काहीशी थंडावल्याचे शेतकरी सांगतात.
विस्तारित औद्योगिक वसाहतीची घोडदौड थांबल्याने या भागातील तरुणाईला स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्याचा मार्ग धूसर झाला आहे. मुळा धरणातून स्वतंत्रपणे पाणी योजना राबवल्याने कारखान्यासाठी पाणी आले. ४५ कोटी रुपये खर्च करून जवळपास ३० ते ३५ किलो मीटर रस्त्याचे काम सुरू झाले. तसेच ३३ बाय ११ के व्ही क्षमतेचे ४ वीज उपकेंद्राद्वारे विद्युत पुरवठा सुविधा केली जाणार आह.
विस्तारित सुपा औद्योगिक वसाहत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन सर्व राजकीय पक्ष व तयांचया कार्यकर्त्यांनी प्रयत्न करताना उद्योजकांना निर्भयपणे आपले कारखाने चालवता येण्याबाबत विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. कारखानदारी वाढण्यासाठी व जपानी पार्क साठी निर्धारित अखंड भूखंड अधिग्रहण झाले तरच ते वाटप करून तेथे उद्योगव्यवसाय सुरू होतील. अन्यथा सुपा परिसर विकासाचे हे स्वप्न फक्त स्वप्नच राहील.
विस्तारित सुपा औद्योगिक वसाहतीतील जपानी पार्क उभारणीबाबत पालक मंत्र्यांशी चर्चा करून या प्रश्नाला गती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल - प्रा. भानुदास बेरड जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी
विस्तारित औदयोगिक वसाहतीतील कारखानदारी वाढवण्यासाठी व जपानी पार्क लवकरात लवकर उभे रहावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. - मा आमदार दादाभाऊ कळमकर