ज्वारी करपू लागली
By Admin | Published: October 5, 2014 11:54 PM2014-10-05T23:54:06+5:302014-10-05T23:56:44+5:30
अहमदनगर : परतीच्या पावसाअभावी जिल्ह्यातील रब्बी हंगामात पेरलेली पिके करपू लागली आहेत.
अहमदनगर : परतीच्या पावसाअभावी जिल्ह्यातील रब्बी हंगामात पेरलेली पिके करपू लागली आहेत. पाऊस आणखीन काही दिवस लांबल्यास रब्बी हंगामाची अवस्था खरिपाप्रमाणे होण्याची शक्यता आहे.
नगर जिल्हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. साडे सात लाख हेक्टर हंगामाचे क्षेत्र असून त्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र ५ लाख २० हजारांच्या जवळपास आहे. सध्या यातून १ लाख ९९ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली असून साधारण महिनाभरापासून पाऊस लांबल्याने पेरलेली ही ज्वारी आता करपू लागली आहे.
आॅक्टोबर हिटचा तडाखा सुरू झाला आहे. कडाक्याच्या उन्हाळामुळे पिके सुकू लागली असून त्यांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. रब्बी हंगामाचा कालावधी हा १५ आॅगस्ट ते १९ नोव्हेंबर असा आहे. या काळात तीन टप्प्यात ज्वारीची पेरणी होते. गोकुळष्टमी, श्रावणी पोळा आणि त्यानंतर काही भागात ज्वारी पेरली जाते. सर्वात उशिरा ज्वारीची पेरणी जामखेड तालुक्यात होते.
जिल्ह्यात दीड महिन्यांत १ लाख ९९ हेक्टरवर ज्वारी पेरणी झाली असून त्यासोबत मका ४ हजार २७३, हरभरा ६६७, करडई ३२५ या पिकांची पेरणी झालेली आहे. या पेरणीची टक्केवारी २५ टक्के आहे. परतीच्या पावसावर हंगामातील अन्य पिकांच्या पेरण्या अवलंबून आहेत. साधारण दिवाळीनंतर गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या पेरणीला सुरूवात होते. या पेरण्या नोव्हेंबर अखेर सुरू असतात. बागायत भागात पाटपाण्याच्या जोरावर गहू, हरभरा पिके घेतली जात आहेत. परतीचा पाऊस न झाल्यास हंगामातील अन्य पिकांच्या पेरणीवर त्याचा परिणाम होणार असून वाढ अवस्थेत असणाऱ्या ज्वारीला त्याचा फटका बसणार आहे.
(प्रतिनिधी)