कोपरगावातील अवैध कत्तलखान्यांवर फिरला जेसीबी, अनाधिकृत शेड काढून घेण्याच्या दिल्या होत्या नोटिसा
By सचिन धर्मापुरीकर | Published: June 20, 2024 03:41 PM2024-06-20T15:41:11+5:302024-06-20T15:41:28+5:30
शहरातील संजयनगर, आयशा कॉलनी भागातील अवैध कत्तलखान्यांवर पालिका प्रशासनाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात जेसीबी फिरविला.
कोपरगाव (जि. अहमदनगर) : शहरातील संजयनगर, आयशा कॉलनी भागातील अवैध कत्तलखान्यांवर पालिका प्रशासनाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात जेसीबी फिरविला. यावेळी जवळपास पाच अवैध कत्तलखाने जमिनदोस्त करण्यात आले. संबंधित जागा मालकांना नोटिसा बजाऊनही त्यांनी अनाधिकृत शेड काढून न घेतल्याने ही कारवाई करण्यात आली. कोपरगाव शहरातील संजयनगर, आयशा कॉलनी भागात १७ जून रोजी कत्तलीसाठी आणलेल्या सहा गायींची सुटका पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने केली होती. यावेळी गोमांस व इतर साहित्य असा एकूण जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याा घटनेनंतर बुधवारी शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने नगर परिषद व शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी अवैध कत्तलखाने हटविण्याची मागणी केली होती. गुरूवारी सकाळी अकरा वाजता नगर परिषद व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या अवैध कत्तलखान्यांवर जेसीबी चालविला. यावेळी बैल बाजार रोड परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. या मोहिमेत नगर पालिकेच्या टाऊन प्लानिंग विभागाची टीम, बांधकाम विभागाचे पथक, तसेच शिघ्र कृती दलाची तुकडी, शहर व तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी सहभागी होते.
नोटीसा देऊन कारवाई
येथे चालणाऱ्या अवैध कत्तलखान्यांबाबत सोमवारी जो गुन्हा दाखल झाला, त्या अनुषंगाने संबंधीत जागा मालकांना २४ तासांत अनाधिकृत कत्तलखाने हटविण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यांनी ते अनाधिकृत बांधकामे काढून घेतली नाही, म्हणून ही कारवाई करण्यात आली, असल्याची माहिती कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली.