बसमधून प्रवासादरम्यान माय-लेकीचे दागिने चोरीला
By शेखर पानसरे | Published: June 20, 2023 03:36 PM2023-06-20T15:36:04+5:302023-06-20T15:36:53+5:30
संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करत असताना माय-लेकीचे दागिने चोरीला गेले. रविवारी (दि.१८) दुपारी ४. ५० ते संध्याकाळी ६. १५ दरम्यान लोणी-संगमनेर प्रवासादरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी (दि.१९) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लोणी येथील ४६ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, लोणी येथून संगमनेरात येण्यासाठी ४६ वर्षीय महिला आणि त्यांची मुलगी या परिवहन महामंडळाच्या बसमध्ये (एम. एच. ४०, ए.क्यू. ६३१७) बसल्या. प्रवासादरम्यान या माय-लेकीचे दागिने चोरीला गेले. नंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.
८० हजार रुपये किमतीचे चार तोळ्यांचे मंगळसूत्र, ३० हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅमचे पेडंट, १० हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅमचे कानातले असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बी. के. धिंदळे अधिक तपास करत आहेत.