सोमैया महाविद्यालयातील ३६ विद्यार्थ्यांना नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:20 AM2021-01-20T04:20:55+5:302021-01-20T04:20:55+5:30
कोपरगाव : शहरातील के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि रुरल शोर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ...
कोपरगाव : शहरातील के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि रुरल शोर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.१६ जानेवारी) ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत आयोजित बजाज फायनान्स या कंपनीसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये महाविद्यालयाच्या एकूण ३६ विद्यार्थी, विद्यार्थिनींची निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.
या नोकरी मेळाव्यात मुलाखतीसाठी एकूण ६४ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी ३६ विद्यार्थ्यांची बजाज फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अंतिम निवड केली. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत वर्षभर विविध कंपन्यांच्या सहकार्याने कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येत असते. यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना अशाप्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, असेही डॉ. यादव यांनी सांगितले.
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनासोबतच जी.पी.एफ., ग्रॅच्यु्ईटी, तसेच मेडिकल या सुविधाही पुरविल्या जाणार असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. संतोष पगारे यांनी दिली. यावेळी कार्यालय अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे हेही उपस्थित होते.
कॅम्पस इंटरव्ह्यूच्या यशस्वीतेसाठी प्रा. व्ही. सी. ठाणगे व डॉ. जी. के. चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे अशोक रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, सदस्य संदीप रोहमारे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. (वा.प्र.)