पत्रकार मारहाण प्रकरण : राहुरीमध्ये कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 11:17 AM2019-03-21T11:17:56+5:302019-03-21T11:27:24+5:30
राहुरीमध्ये ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांसह व्यापारी व इतर दहा ते पंधरा जणांना जबर मारहाण करण्यात आली. ही घटना काल सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
अहमदनगर: राहुरीमध्ये ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांसह व्यापारी व इतर दहा ते पंधरा जणांना जबर मारहाण करण्यात आली. ही घटना काल सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ राहुरीमध्ये आज सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. याप्रकरणी काल संजय मोहन मोटे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
राहुरी येथे पत्रकार, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना गुंडांनी विनाकरण मारहाण करून दंगल करत दहशत निर्माण केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ व्यापारी असोसिएशनसह नागरिकांनी शहर बंदची हाक दिली होती. त्यामुळे सकाळपासूनच शहरात बंद पाळण्यात येत आहे. राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, राहुरी तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाडेकर, राहुरी प्रेस क्लबचे अध्यक्ष सुनील रासने यांसह तालुक्यातील सर्व पत्रकार, राहुरी व्यापारी संघटना, पॅथॉलॉजी संघटना, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, मराठा एकीकरण, प्रहार अपंग संघटना, यशवंत सेना, डॉक्टर असोसिएशन, शेतकरी संघटना यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.