ज्वारीचे क्षेत्र निम्म्याने घटले
By Admin | Published: December 23, 2015 11:20 PM2015-12-23T23:20:01+5:302015-12-23T23:25:15+5:30
केडगाव : रब्बीचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ज्वारी पिकाचे मोठे आगार असलेल्या नगर तालुक्यात कमी पावसामुळे ज्वारीच्या उत्पादनात ५० टक्क्यांनी घट होणार
केडगाव : रब्बीचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ज्वारी पिकाचे मोठे आगार असलेल्या नगर तालुक्यात कमी पावसामुळे ज्वारीच्या उत्पादनात ५० टक्क्यांनी घट होणार असून, यंदा गव्हाच्या पेरण्याच झाल्या नाहीत.
नगर तालुक्यात जवळपास ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली. अवर्षणप्रवण क्षेत्रात येणारा व कमी पर्जन्यमानामुळे रब्बीचा तालुका म्हणून नगर तालुक्याची ओळख आहे. त्यातही ज्वारीचे लाखो हेक्टर क्षेत्रावर पीक घेतले जाते. ज्वारीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे आगार असूनही यावर्षी मात्र पावसाने दगाफटका केल्याने ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. एक-दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना, ज्वारीचे शिवार बहरले आहे.
वाळकी, गुंडेगाव, देऊळगाव सिद्धी, राळेगण म्हसोबा, वडगाव-तांदळी या वाळकी गटातील गावांमध्ये मात्र पाऊस नसल्याने या भागातील ज्वारीचे रान ओसाड आहे. हीच परिस्थिती चिचोंडी पाटील गटात येणाऱ्या गावांची आहे.
या भागातही समाधानकारक पाऊस नसल्याने ज्वारीच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. निंबळक, खारेकर्जुने, नेप्ती, जखणगाव आदी भागांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने तेथील कसदार जमिनींमध्ये ज्वारीची पिके आता कणसावर येऊ लागली आहेत.
चास, कामरगाव या पट्ट्यातही पावसाने थोडीफार कृपादृष्टी दाखवल्याने ज्वारीचे शिवार बहरत आहे. सध्या आभाळी वातावरण असल्याने ज्वारीच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर दिसत आहेत. नगर तालुक्यात ज्वारीच्या उत्पादनात ५० टक्क्याहून अधिक घट होणार आहे.
विळद, देहरे, नांदगाव, शिंगवे अशी तालुक्यातील चार-दोन गावे सोडली तर गव्हाची पेरणी कुठेच झाली नाही. तालुक्यात गव्हाच्या पेरणीत १० टक्क्याने घट झाली आहे. बहुतांशी ठिकाणी गव्हाची पेरणीच झाली नाही.
कमी पाऊस आणि पाण्याचे उद्भव कोरडे पडत चालल्याने गव्हाच्या लागवडीवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. हरभऱ्याचे पीक मात्र काही भागात चांगल्याप्रकारे दिसत आहे.
(वार्ताहर)