जांभूळ झाले दुर्मिळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:52 AM2018-06-13T10:52:11+5:302018-06-13T10:54:49+5:30
औषधी व गुणकारी फळांचा दर्जा असणाऱ्या जांभळाच्या झाडांची संख्या कमालीची घटल्याने हे फळ आता दुर्मिळ बनत आहे. जुन्या झाडांची झालेली तोड आणि नव्या झाडांच्या लागवडीकडे कल कमी झाल्याने फळांच्या बाजारातून जांभूळ जवळपास गायब होण्याच्या मार्गावर आहे. नगरच्या फळांच्या बाजारातही जांभूळ दिसेनासे झाले आहे
योगेश गुंड
केडगाव : औषधी व गुणकारी फळांचा दर्जा असणाऱ्या जांभळाच्या झाडांची संख्या कमालीची घटल्याने हे फळ आता दुर्मिळ बनत आहे. जुन्या झाडांची झालेली तोड आणि नव्या झाडांच्या लागवडीकडे कल कमी झाल्याने फळांच्या बाजारातून जांभूळ जवळपास गायब होण्याच्या मार्गावर आहे. नगरच्या फळांच्या बाजारातही जांभूळ दिसेनासे झाले आहे.
पूर्वी पाऊस पडायला सुरुवात झाली की जांभळाच्या झाडाखाली फळांचा सडा पडत असे. बाजारातही या फळांच्या विक्रेत्यांची मोठी संख्या असायची.आंबट-गोड चवीची ही फळे ग्राहकांना नेहमीच आकर्षित करत.अनेकांना रोजगार या फळांच्या विक्रीतून मिळत. मात्र अनेक आजारांवर गुणकारी समजले जाणारे आणि औषधी फळांची मान्यता लाभलेले जांभूळ आता बाजारात तर दिसेनासे झाले आहे. फळविक्रेत्यांकडेही जांभूळ विक्रीसाठी दिसत नाही.नगरच्या फळांच्या बाजारात या फळांची आवक कमालीची घटल्याचे सांगण्यात आले. सध्या ठोक बाजारात जांभळाला १०० रुपये किलो तर किरकोळ बाजारात १६० रुपये किलो भाव आहे. नगरच्या बाजारात काही मोजके शेतकरीच जांभूळ विक्रीसाठी आणत आहेत. फळांच्या बाजारातच या फळाची आवक घटत चालल्याने ग्राहकांना या फळाचे दर्शनही दुर्लभ झाले आहे.
पूर्वी शेताच्या बांधावर जांभळाच्या झाडांची लागवड होत असत. शेतीचे आकार लहान होत गेले तशी जांभळाची झाडेही कमी होत गेली .संपूर्ण नगर तालुक्यात एक-दोन शेतकºयांकडे जांभळाच्या थोड्याफार बागा आहेत. मुळात जांभूळ बागांच्या लागवडीकडे दुर्लक्ष होत गेल्याने झाडांची संख्या आणि आता पर्यायाने फळांची संख्या घटू लागली आहे.जांभूळ हे नाजूक फळ असल्याने झाडावरून खाली पडले तरी खराब होऊन जाते.यामुळे त्याची तोडणी नाजूकपणे करावी लागते.एक-एक फळ तोडून त्याची काढणी करावी लागते.
जांभळातील उपयोगी घटक
प्रोटीन, फॅट, मिनरल, फायबर,कार्बोहायड्रेट्स,कॅल्शियम,फॉस्फरस ,आयर्न, कैलोरीफिक .
डायबेटीससाठी वरदान
जांभूळ फळांच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते याबरोबरच शरीरातील जवळपास १२ आजारांसाठी आयुर्वेदात जांभळाचे उपयोग सांगितले आहेत. औषधी फळ म्हणून जांभळाला मान्यता आहे.
मी रोज १० क्रे ट जांभळाचे फळे नगरच्या बाजारात विक्रीसाठी नेतो. मात्र नगरपेक्षा मुंबई-पुण्याच्या बाजारात या फळांना जास्त मागणी आहे. सध्या बाजारात या फळांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. नाजूक फळ असल्याने त्याची जास्त काळजी घ्यावी लागते. जास्त कोणी या फळांच्या लागवडीकडे वळत नाही. मुळात जांभळाची बाग ही संकल्पनाच आपल्याकडे अजून रुजली नाही. त्यातच हे झाड लावल्यानंतर खूप उशिराने फळे येतात. इतके वर्षे कोणी थांबण्यास तयार होत नाही. यामुळे या झाडांची लागवड दुर्लक्षित आहे.
-अनिलकुमार लांडगे, शेतकरी
वातावरणातील बदलामुळे जांभूळ फळांची आवक मोठ्या प्रमाणात घटत आहे.एरव्ही पावसाळा सुरु झाला की फळे बाजारात येण्यास सुरुवात होते. किरकोळ फळांच्या स्टॉलवरही आता जांभूळ पाहण्यास मिळत नाही. सध्या फळांच्या बाजारात जांभूळ दिसेनासे झाले आहे.
-अशोक शेळके, फळांचे व्यापारी