नेवासा येथील पठाण हत्याकांडातील आरोपीसह दरोडेखोरांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 02:20 PM2018-06-18T14:20:04+5:302018-06-18T14:20:17+5:30
नेवासा येथील बहुचर्चित अॅड. पठाण हत्याकांडातील फरार आरोपी सादीक बशीर शेख (वय ३६, रा. नेवासा) व दरोड्याच्या तयारीतील इतर चार आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री शनिशिंगणापूर फाटा येथे पाठलाग करुन पकडले.
अहमदनगर : नेवासा येथील बहुचर्चित अॅड. पठाण हत्याकांडातील फरार आरोपी सादीक बशीर शेख (वय ३६, रा. नेवासा) व दरोड्याच्या तयारीतील इतर चार आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री शनिशिंगणापूर फाटा येथे पाठलाग करुन पकडले.
रविवारी (दि. १७) रात्री पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, हवालदार मन्सूर सय्यद, योगेश गोसावी, रवींद्र कर्डिले, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, विजय ठोंबरे, संतोष लोंढे, सचिन अडबल, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, बाळासाहेब भोपळे, संभाजी कोतकर हे राहुरी परिसरात काही ‘वॉन्टेड’ गुन्हेगारांचा शोध घेत होते. त्याचवेळी काही दरोडेखोर दरोड्याच्या तयारीने जात असल्याची माहिती पवार यांच्या पथकाला मिळाली. त्यांनी इंडिका कारचा पाठलाग करुन पाच जणांना ताब्यात घेतले. त्यात सादीक बशीर कुरेशी (वय ३६, रा़ नेवासा), संतोष सुरेश कांबळे (वय २८, रा. श्रीरामपूर), साबीर शब्बीर सय्यद (वय २५, रा. श्रीरामपूर), अन्वर लतीफ मन्सुरी (वय २५, रा. श्रीरामपूर), सागर सुरेश कांबळे (वय २२, रा. श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. या आरोपींविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी सादीक बशीर कुरेशी (वय ३६, रा. नेवासा) हा नेवासा येथील बहुचर्चित अॅड. रियाज पठाण हत्याकांडातील प्रमुख आरोपी व कुख्यात गुंड सोपान गाडे याचा साथीदार आहे. तो गेल्या पाच वर्षांपासून फरार होता, असे पोलिसांनी सांगितले.