संतप्त महिलांचा जामखेड पोलीस ठाण्याला घेराव; ग्रामीण रुग्णालयाला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:17 PM2018-04-30T13:17:57+5:302018-04-30T13:29:30+5:30
जामखेडमधील महिलांनी पोलीस ठाण्याला सोमवारी घेराव घातला. तसेच राळेभात बंधूंवर उपचारासाठी उशीर करणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचे निलंबन करावे, यासाठी महिलांनी रुग्णालयाला टाळे ठोकले.
जामखेड : राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी जामखेडमधील महिलांनी पोलीस ठाण्याला सोमवारी घेराव घातला. तसेच राळेभात बंधूंवर उपचारासाठी उशीर करणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचे निलंबन करावे, यासाठी महिलांनी रुग्णालयाला टाळे ठोकले.
शनिवारी (दि. २८) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास राळेभात बंधुवर गुंडांनी गोळीबार करून ठार मारले. यामधील आरोपींना अटक करावे तसेच तालमीच्या नावाखाली गुंड पोसण्याचे काम माने कुटुंब करीत आहेत. त्यांना याप्रकरणी सहआरोपी करावे, अशी मागणी करीत सोमवारी सकाळी जामखेडमधील महिलांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला.
राळेभात बंधूंच्या उपचाराला उशीर करणा-या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराचे निलंबन करावे व रूग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध होईपर्यंत दवाखाना उघडून देणार नाही, असे सांगत संतप्त महिलांनी ग्रामीण रुग्णालयाला टाळे ठोकले. यानंतर महिलांचा संतप्त मोर्चा नगरपरिषदेवर आला. नगरपरिषदेचा तालीमला असलेला परवाना तातडीने स्थायी समितीची सभा घेऊन रद्द करावा, तालीमवर बुलडोझर चालवून उद्धवस्त करावी, अशी मागणी केली़ तसेच याची दखल न घेतल्यास चार दिवसानंतर तालीम पाडण्याचा इशारा महिलांनी दिला. वरील सर्व मागण्यांचा विचार न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा महिलांनी दिला.
माजी नगराध्यक्षा प्रिती राळेभात, नगरसेविका कमल राळेभात, रूपाली राळेभात, चंद्रकला राळेभात, सुनीता राळेभात, पदमा वारे, रूपाली काकडे, वंदना राळेभात, उषा राळेभात, वैशाली राळेभात, लता राळेभात, योगीता राळेभात यांच्यासह सुमारे दोनशे संतप्त महिलांनी मोर्चा काढला.