'जरा याद करो कुर्बाणी'... विद्यार्थीनींचं गाणं ऐकून स्टेजवरील वीरपत्नींच्या डोळ्यात पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 10:05 AM2023-08-15T10:05:51+5:302023-08-15T10:21:05+5:30
मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत वीर पत्नी, निवृत्त सैनिकांच्या सन्मानार्थ रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात भव्य रॅली काढण्यात आली होती.
अहमदनगर - देशात आज स्वातंत्र्याचा ७६ दिन साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्याहस्ते लाल किल्ल्यावर सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहन झाल्यानंतर देशातील सर्वच शाळा, महाविद्यालये, संस्था आणि कार्यालयात झेंडावंदन करण्यात आले. देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या मेरी माटी मेरा देश उपक्रमही याच काळात रावबिण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शहीदांना अभिवादन करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अशाच एका कार्यक्रमात चिमुकलीने देशभक्तीपर गाणं गायलं अन् स्टेजवरील वीरपत्नींच्या डोळ्यात पाणी तरळल्याचं पाहायला मिळालं.
मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत वीर पत्नी, निवृत्त सैनिकांच्या सन्मानार्थ रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीच्या समारोपावेळी समृध्दी दिपक त्रिभुवन हिने देशभक्तीपर गीत गायलं. गीताचे बोल ऐकून वीर पत्नींचा डोळ्यात अश्रू तरळले.
ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भर लो पाणी
जो शहिद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बाणी
समृद्धीने हे लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं व्यासपीठावरुन म्हणायला सुरुवात केली. जब देश मे थी दिवाली, ओ खेल रहे थे गोली... हे शब्द लहानग्या विद्यार्थीनीकडून गायले जात असताना व्यासपीठावर मान्यवर म्हणून उपस्थित राहिलेल्या वीरपत्नी-वीरमातांना अश्रू अनावर झाल्या. गाण्याचे बोल ऐकून देशासाठी सीमारेषेवर शहीद झालेल्या पती, मुलाची आठवण त्यांना झाली. यावेळी, कार्यक्रमास्थळी वातावरण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन समोर आला आहे. व्हिडिओ पाहूनही अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. दरम्यान, कवि प्रदीप यांनी हे गाणं लिहिलं होतं, जे लता मंगेशकर यांनी गायलं. तर, सी. रामचंद्र यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं होतं.